वऱ्हाडातील धरणात २८.१ टक्के जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 04:46 PM2019-08-09T16:46:55+5:302019-08-09T16:47:06+5:30
अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्के साठा आहे.
अकोला : पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बुधवारपासून बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने ५०२ प्रकल्पांतील जलसाठ्यात २८.०१ टक्के वाढ झाली आहे. अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा २७ टक्क्यांवर पोहोचला असून, अकोला जिल्ह्यातील वान धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. या ५०२ प्रकल्पांत गुरुवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत २८.०१ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. मोठ्या ९ धरणांतील बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचा साठा शून्य टक्केच तर अकोला शहराची तहान भागविणाºया काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्केच जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात २७.४२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात ३४.८१, अरुणावतीमध्ये ११.४०, अरुणावती धरणात ५७.३० टक्के जलसाठा संचयित झाला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्के साठा आहे. याच जिल्ह्यातील वान धरणात मुबलक जलसाठा संचयित झाल्याने या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणात ४१.२० टक्के, नळगंगा धरणात १४.६७ टक्के साठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ४५.१२ टक्के साठा उपलब्ध झाला. यामध्ये अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील चार मध्यम प्रकल्प शून्य टक्क्यावरच आहेत. ४६९ लघू प्रकल्पांत १७.१३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.