पाणीटंचाई आराखडा पुढील महिन्यात होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 03:00 PM2019-12-08T15:00:40+5:302019-12-08T15:00:46+5:30
सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे.
अकोला : चालू वर्षातील पावसाळा पुरेसा आणि जमिनीत पाणी मुरवणारा झाल्याने दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या अद्याप निर्माण झाली नाही. त्याचवेळी टंचाईसाठी प्रमाण मानले जाणाऱ्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा विहिरींचा पाणी पातळी अहवालही नोव्हेंबरऐवजी जानेवारीमध्ये तयार केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई आराखडाही त्यानंतरच तयार केला जाणार असल्याची माहिती आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात सात तालुक्यांमधील निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीच्या अहवालावरून जिल्ह्यात आगामी काळातील पाणीटंचाईची समस्या पुढे येऊ शकते. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा होतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थिर राहते. यावर्षी परतीचा पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीवरही परिणाम झाला. येत्या काही दिवसांत पिकांसाठी पाण्याचा उपसा वाढणार आहे. त्यानंतर भूजलाची पातळी निश्चित करण्यास अनुकूल काळ निर्माण होईल. त्यामुळे चालू वर्षात नोव्हेंबरऐवजी डिसेंबर, जानेवारी महिन्यातच भूजल पातळी नोंदविण्याची तयारी भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे. त्या अहवालानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडाही निश्चित होणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निरंक असल्याचा अहवाल आहे.
पाणी जिरण्यालाही लागतो वेळ!
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्वेक्षणानुसार, आपण जे जमिनीतील पाणी वापरतो, ते ५० ते १०० वर्षे अगोदर जमिनीत जिरलेले असू शकते. जमिनीत पाणी जिरताना १०० फूट खोलानंतर एक फूट खाली जाण्यासाठी पाण्याला चार महिने (१२० दिवस) लागतात. नैसर्गिक स्रोत हाच एकमेव पर्याय असल्याने पाणी किती आणि कसे वापरावे, याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.
गतवर्षीची तालुकानिहाय घट
तेल्हारा तालुक्यामध्ये पाणी पातळीत तब्बल ३.०७ मीटरने घट झाली होती. बाळापूर तालुक्यात २.५३, अकोटमध्ये ४.५९, पातूरमध्ये १.८६, मूर्तिजापूरमध्ये १.४४ तर अकोला तालुक्यामध्येही पाणी पातळीत मोठी घट होती. या तालुक्यात ०.२२ मीटर पाणी पातळीत घट झाली होती. चालू वर्षी हा अहवाल जानेवारीनंतर तयार होणार आहे.