अकोला एमआयडीसीला पुन्हा खांबोरा येथून पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 03:03 PM2018-11-12T15:03:11+5:302018-11-12T15:03:39+5:30
अकोला : एमआयडीसी परिसराला होत असलेला दूषित पाणी पुरवठा अखेर बंद झाला असून, खांबोराच्या पाणी पुरवठा योजनेमधून शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.
अकोला : एमआयडीसी परिसराला होत असलेला दूषित पाणी पुरवठा अखेर बंद झाला असून, खांबोराच्या पाणी पुरवठा योजनेमधून शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.
काही दिवसांपासून एमआयडीसीत दूषित पाणी पुरवठा होता, चारशे ते सातशे टीडीएसचे प्रमाण असलेले पाणी परिसरातील कामगार प्राशन करीत असून, त्यांच्या आरोग्यास धोका असल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांनी कुंभारी तलावाच्या पाण्याचे नमुने शासकीय यंत्रणेकडे तपासणीसाठी पाठविले. त्यातदेखील पाणी दूषित आढळले. त्यामुळे कुंभारीचा पाणी पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. दरम्यान, उन्हाळ्यापासून बंद करण्यात आलेला खांबोरा पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे मात्र पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या कुंभारी तलावाचे पाणी दूषित झाले तरी कसे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
दूषित पाण्याचा निचरा सोडणाऱ्यांचा शोध
कुं भारी तलाव परिसरात जे उद्योग आहे, त्यांचा कारखान्याचा सांडवा कुंभारीच्या तलावात सोडला जातो. अशा उद्योगांचा शोध आता सुरू झाला आहे. काही मोजक्या कारखानदारांनी संपूर्ण तलावाचे पाणी दूषित केले आहे. त्या कारखान्याचा शोध घेणे सुरू आहे. यासाठी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे; मात्र इंडस्ट्रीजच्या पदाधिकाºयांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही.
एमआयडीसीला दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर आम्ही चाचपणी केली. त्या वृत्तास दुजोरा मिळाल्यानंतर आम्ही तातडीने कुंभारीचा पाणी पुरवठा थांबविला आहे. आता खांबोरातून पाणी पुरवठा होत आहे.
- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला.