लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा औद्योगीक वसाहतीमधील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कुंभारी तलावातून होत असलेला जलसाठा डिसेंबर पुरेल ऐवढाच असल्याने एमआयडीसीच्या अभियंतांनी पाणी पुरवठ्यात कपात करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. दरम्यान, पाणी पुरवठ्यावर पर्याय शोधण्यासाठी येत्या २४ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे बैठक बोलाविण्यात आली आहे.
यंदा अकोल्यात पाऊस नसल्याने पीक तर गेलेचं. सोबतच पिण्याच्या पाण्याचीही नवी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हातील धरणांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे ६४ खेडी खांबोरा पाणी पुरवठा प्रकल्पातून होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा काही महिन्याआधी बंद करण्यात आला. त्यामुळे अकोला एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणी पुरवठा सुरू केला. मात्र कुंभारी तलावाचा जलसाठाही आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे अकोला एमआयडीसीचा पाणी पुरवठा तीन दिवस आड करण्यात आला आहे. डिसेंबर पर्यंत हे पाणी पुरेल मात्र त्यानंतर अकोल्यातील शेकडो उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे.