६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचे करणार पुनरुज्जीवन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:57 AM2020-08-08T10:57:12+5:302020-08-08T10:57:19+5:30
प्रस्तावाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे.
अकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे.
६४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी शिकस्त झाली असून, या जलवाहिनीवर ठिकठिकाणी लिकेजेस होत आहेत. तसेच पाणी उचल करण्याचे पंपदेखील वारंवार बंद पडत असल्याने या योजनेंतर्गत गावांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ठेवण्यात आला. त्यानुसार ६४ खेडी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावाला या सभेत मंजुरी देण्यात आली. पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कामाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले. तसेच योजनेच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर ही पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जिल्हा परिषद हस्तांतरित करणार असल्याचेही सभेत ठरविण्यात आले. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा आढावा या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष सावित्री राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समितीचे सदस्य मीरा पाचपोर, संजय बावणे, माया कावरे, अपू तिडके, संजय आढाऊ यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा व लघुसिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वित्त आयोगाचा निधी पाणीपुरवठ्यासाठी खर्च करा!
पंधराव्या वित्त आयोगाचे अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामावर खर्च करण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले.
बंधारे दुरुस्तीचा आराखडा करा!
जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे, तलावांची दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश लघुसिंचन विभागाला यासाठी देण्यात आले.