- संतोष येलकर
अकोला : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि पाणीपुरवठा योजना नसलेल्या ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांना शासनामार्फत १८ जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आली.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रतिदिवस दरडोइ ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत दरडोइ ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा होत नसलेल्या ७३५ गावांत प्रतिदिवस दरडोई ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, तसेच पाणीपुरवठा योजना नसलेल्या जिल्ह्यातील ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यास शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली. यासंदर्भात शासनामार्फत १८ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून, ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात येणार आहेत.
नळ जोडण्यांच्या कामांसाठी ७७.८९ कोटी रुपये मंजूर!
जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांमध्ये १ लाख २० हजार २१८ नळ जोडण्या देण्याच्या कामांसाठी ७७ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील ७३५ गावांमध्ये नळ जोडणी नसलेल्या कुटुंबांना नळ जोडणी देण्याची कामे करण्यात येणार आहेत.
योजनांच्या कामांची सादर करावी लागणार अंदाजपत्रके!
जल जीवन मिशनअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, तसेच ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन व नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करावी लागणार आहेत.