अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ३४ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असताना, बार्शीटाकळी तालुक्यातील आणखी दोन गावांमध्ये मंगळवार, ११ जूनपासून ३ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांत तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ३४ गावांमध्ये ३७ टँकरद्वारे पाणी पुरवठा यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त आणखी कान्हेरी सरप व धानोरा या दोन गावांमध्ये तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा आदेश मूर्तिजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी १० जून रोजी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेल्या गावांची संख्या आता ३६ वर पोहोचली आहे.