हिंगणा तानखेड येथून होणार पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:37 AM2017-08-18T01:37:29+5:302017-08-18T01:37:35+5:30
मूर्तिजापूर : महान धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तिजापूर शहराला हिंगणा तानखेड व शिवण लघू धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

निम्मा पावसाळा निघून गेला असला, तरी मूर्तिजापूर शहर व तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांनी तळ गाठला असून, मूर्तिजापूर ग्रामीण व शहरी भागात जल संकट निर्माण झाले आहे. महान धरणात पाणी नसल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. हिंगणा बंधारा येथून सध्या शहराकरिता पाणी येत आहे. परंतु, तेथेही जास्त पाणी साठा नसल्याने पाऊस न आल्यास भीषण पाणी समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नैसर्गिक बिकट स्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन शक्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत आमदार हरीश पिंपळे, आ. गोपीकिसन बाजोरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर, वीज वितरणचे मुख्य अभियंता अकोला दोडके, उंबरकर, मूर्तिजापूर नगराध्यक्ष मोनाली गावंडे व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान मूर्तिजापूर शहरासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाई निर्माण होत आहे. यावर शहरासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे.