नदीतील पाणी शेततळ्यात घेऊन केली मत्स्यशेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 02:00 PM2019-05-12T14:00:36+5:302019-05-12T14:00:40+5:30
तेल्हारा: तालुक्यातील नेर येथील एका अल्पधारक शेतकऱ्याने आपल्या शेतात शेततळे खोदले व त्यामध्ये मत्स्यशेती करीत आहेत
- सत्यशील सावरकर
तेल्हारा: तालुक्यातील नेर येथील एका अल्पधारक शेतकऱ्याने आपल्या शेतात शेततळे खोदले व त्यामध्ये मत्स्यशेती करीत आहेत. त्याच बरोबर परिसरातील तीन गावातील नागरिक व गुराढोरांच्या पाण्याची समस्या दूर केली.
तालुक्यातील नेर येथील भगवंत शालीग्राम बावने या शेतकºयाने आपल्या शेतात तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतात शेततळे खोदून घेतले. शासनाचा निधी व आपल्या मिळकतीतून शेततळ्यात पाणी भरण्यासाठी चार हजार फुटावरून पाइपलाइन टाकून पूर्णा नदीतील डोहातून पाणी घेतले व शेततळे भरले. शेतातील जमीन चोपन असल्याने पाणी जिरू नये म्हणून टाकण्यात येत असलेली फिल्म टाकण्याची गरज नसल्याने तो खर्च कमी झाला. त्यात जवळचे पैसे टाकून व्यवसाय करण्याचे ठरविले. दरवर्षी होणारी नापिकी, खरिपात पिकाचे कीड व रोगाने उत्पादन घटले. खरिपाच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेततळ्यातील पाण्यावर रब्बीत बागायती पिके घेतल्यापेक्षा आपल्या वंशपरंपरागत मत्स्यशेतीचा पर्याय भगवंत बावने यांनी निवडला. शेततळ्यात पंधरा हजार मत्स्यबीज सोडले असून, ते विक्रीसाठी तयार होत आहेत. त्यापासून दोन लाखापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे.
शेततळ्यातील जोडव्यवसाय उत्पन्न देत राहील; परंतु सामाजिक भान ठेवून भगवंत बावने यांनी परिसरातील नेर, सांगवी, पिवंदळ या गावातील नागरिकांना तथा गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा काही अंशी कमी केला. खारपाणपट्टा असल्याने दूर दूर पाणी दिसत नाही; परंतु नेर सांगवी, चोहोट्टा रस्त्यावरील तुडुंब भरलेले शेततळे रखरखत्या उन्हाळ्यात दिलासा देत आहेत.
मासेमारी हा परंपरागत व्यवसाय आहे; परंतु दिवसेंदिवस नद्यांचे पाणी पावसाळ्यातसुद्धा दिसत नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय व मत्स्य व्यवसाय करणाºया पत संस्था डबघाईला आल्या आहेत. पूर्णा नदीखोºयात शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यशेती करण्यासाठी शासनाच्या शेततळे योजनेतून शेततळे करून शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
भगवंत बावने, शेतकरी.