सातपुड्याच्या पायथ्याशी बहरली कलिंगड शेती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 03:01 PM2019-04-06T15:01:45+5:302019-04-06T15:01:54+5:30
अकोट : कॉटन बेल्ट, आॅरेंज बेल्टनंतर आता अकोट तालुक्यातील सातपुड्याचा पायथा कलिंगड लागवडीसाठी ओळखल्या जाऊ लागला आहे.
अकोट : कॉटन बेल्ट, आॅरेंज बेल्टनंतर आता अकोट तालुक्यातील सातपुड्याचा पायथा कलिंगड लागवडीसाठी ओळखल्या जाऊ लागला आहे. या भागात कलिंगडाची केलेली लागवड व होणारे उत्पन्न पाहता दिवसेंदिवस या फळबाग व्यवसायाकडे कल वाढू लागला असल्याचे चित्र दिसत आहे.
अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते. भावसुद्धा विदर्भात सर्वात जास्त मिळतो. त्यापाठोपाठ येथील संत्र्याला चांगली मागणी असल्याने कॉटन बेल्ट आणि आॅरेंज बेल्ट असा पट्टा या भागात आहे; परंतु या दोन्ही पिकांकडे उत्पादकांचा ओढा कमी होऊ लागला असून, कलिंगडाच्या लागवडीकडे मात्र कल वाढला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी बोर्डी, आंबोडा परिसरात पवन रूपाजी पवार यांनी कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले आहे. शिवाय, बोर्डी येथील भालतिलक व इतर शेतकऱ्यांनीही कलिंगडची लागवड केली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली जमीन रेताळ, मध्य काळी व गाळाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी आहे. त्यामुळे पवन पवार यांनी जानेवारी महिन्यात जमीन नांगरून कलिंगड लागवडीसाठी चार मीटर अंतरावर पाटसऱ्या काढल्या. दोन मीटर रुंद उंच गादी वाफ्यांमध्ये कलिंगड बियाण्यांची पेरणी केली. सिंचनाचे योग्य व्यवस्थापनही केले. वेलींची गुंतागुंत होऊ नये, याकरिता विशिष्ट अंतर ठेवले. वेळोवेळी सेंद्रिय खत व बुरशीनाशक प्रक्रिया केली. याकरिता त्यांना प्रतिएकर ६० ते ७० हजार रुपये खर्च आला. सध्या हे कलिंगड परिपक्व झाले असून, बाजारपेठेत विकण्याकरिता काढण्यात येत आहेत. केवळ तीन महिन्यांमध्ये प्रतिएकर २० ते २५ टन उत्पादन होण्याची शक्यता पवन पवार यांनी व्यक्त केली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी तयार होत असलेल्या कलिंगडामध्ये कमी बिया व गोडवा असल्याने बाजारपेठेतसुद्धा मागणी होऊ लागली आहे. पूर्वी बाहेरगावाहून बाजारपेठेत कलिंगड विक्रीकरिता यायचे; मात्र आता या परिसरातील शेतकरीच फळ पिकांकडे वळल्याचे सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कलिंगडाच्या शेतीवरून दिसून येत आहे.