पश्चिम वऱ्हाडाला पुन्हा मंत्रिपदाची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 07:04 PM2019-06-07T19:04:41+5:302019-06-08T14:16:49+5:30

अकोला: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे पुन्हा एकदा वाहू लागल्याने पश्चिम वºहाडातील आमदारांच्या मंत्रिपदाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

West vidarbha can get Minister post again | पश्चिम वऱ्हाडाला पुन्हा मंत्रिपदाची आस!

पश्चिम वऱ्हाडाला पुन्हा मंत्रिपदाची आस!

Next

- राजेश शेगोकार
अकोला: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे पुन्हा एकदा वाहू लागल्याने पश्चिम वºहाडातील आमदारांच्या मंत्रिपदाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर पश्चिम वºहाडाला मिळालेले एक मंत्रिपद कमी झाले होते. त्यामुळे या विस्तारात ती कमतरता भरून काढण्याची आस कार्यकर्त्यांना आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असल्याने शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठीही पश्चिम वºहाडात मंत्रिपद देण्याची मागणी होत असल्याने शिवसेना आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाशिम व बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याने येथील आमदारांचा दावा प्रबळ असला तरी अकोल्यातील सत्तापक्षाच्या आमदारांनीही आशा सोडलेली नाही.
पश्चिम वºहाडातील अकोल्यात पाचपैकी चार आमदार भाजपाचे आहेत, तर वाशिममध्ये तीनपैकी दोन आमदार भाजपाचे निवडून आलेले आहेत. बुलडाण्याच्या सात विधानसभा मतदारसंघांत भाजपाचे तीन, सेनेचे दोन व काँग्रेसचे दोन असे प्रतिनिधित्व आहे. या आकडेवारीवरून पश्चिम वºहाडात भाजपाचा प्रभाव असल्याचे स्पष्टच आहे. त्या तुलनेत राज्य मंत्रिमंडळात डॉ. रणजित पाटील यांच्या रूपाने एकमेव प्रतिनिधित्व आहे. दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांनाही खूप प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे दोन्ही आमदार विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणारे असल्याने विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी कायमच आहे. भाऊसाहेबांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात विधानसभेतील आमदारांना सामावून घेतले जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली. आता पुन्हा विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्याने मंत्रिपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


संचेतींची महामंडळावर नाराजी
मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले पश्चिम वºहाडातील सर्वात ज्येष्ठ नेते मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांना विदर्भ वैधानिक महामंडळ देण्यात आले आहे; मात्र महामंडळाला कुठलेही आर्थिक अधिकार नसल्याने केवळ शोभेचे हे पद त्यांनी अद्यापही स्वीकारलेले नाही. त्यामधून त्यांची नाराजी स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. मलकापूर हा मतदारसंघ जळगााव खान्देशच्या रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने त्यांचे मंत्रिपद हे दोन विभागांसाठी महत्त्वाचे ठरेल, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

केंद्रीय मंत्रिपदानंतर अकोल्याला काय?
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी चौथ्यांदा विक्रमी विजय मिळवित इतिहास घडविला आहे. त्यांच्या नेतृत्वात अकोला हा भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळेच त्यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड करून भाजपाने त्यांच्या कार्याचा योग्य गौरव केला आहे. त्यांना मिळालेल्या या सन्मानानंतर अकोल्याला पुन्हा राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, असे प्रबळ दावेदार अकोल्यात आहेत. आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे हे ज्येष्ठ आमदार असून, आ. रणधीर सावरकर यांनी पहिल्याच टर्ममध्ये अभ्यासू व आक्रमक आमदार अशी छाप पाडली आहे. त्यामुळे या प्रबळ दावेदारांना संधी मिळेल का, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.

राज्य मंत्रिमंडळात गृह व नगरविकास यांच्यासह अर्धा डझन विभाग सांभाळणारे डॉ. रणजित पाटील व बुलडाण्याच्या जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नावाची भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा होत आहे. डॉ. पाटील हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू तसेच कार्यकुशल मंत्री म्हणून प्रख्यात झाले आहेत. त्यांच्याविरोधात अकोल्यातील भाजपचा खासदार गट असला तरी पाटील यांचा वाढता प्रभाव थांबलेला नाही. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आले तर त्यांना मंत्रिपद सोडावे लागेल. दुसरीकडे डॉ. संजय कुटे हेसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपाची मजबूत बांधणी केली. त्याचेच फळ म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक मते युतीचे प्रतापराव जाधव यांना मिळाली. त्यांचाही मंत्रिपदावर दावा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद किंवा मंत्रिपद यापैकी एकतरी यावेळी नक्की, असा त्यांच्या समर्थकांचा होरा आहे.
---------
वाशिममध्ये पाटणींना हवी ताकद
वाशिम भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हा हाच मतदारसंघ असे समजून विकास निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे. वाशिमच्या भावना गवळी या पाचव्यांदा खासदार झाल्या असून, सेनेचा प्रभाव वाढताच आहे. युती म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पोस्टर बॅनरवरही फोटो न टाकण्यापर्यंत अशा लहानसहान गोष्टीतून अनेक वेळा या दोहांमधील बेबनाव समोर आला आहे. त्यामुळे सेनेचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पाटणी यांना मंत्रिपदाची ताकद मिळावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. 
 
सेनेचे दोन शिलेदार आशावादी
पश्चिम वºहाडातून शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर व डॉ. शशिकांत खेडेकर हे दोन आमदार निवडून आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रतापराव जाधव यांची वर्णी लागेल, ही अटकळ फोल ठरल्यामुळे सेनेला मंत्रिपद मिळण्याची आशा प्रबळ झाली आहे. 

प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा

Web Title: West vidarbha can get Minister post again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.