अकाेला : अकाेल्यातील वाहतुकीला कितीही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी अनेक वाहनचालक या प्रयत्नांना भीक घालत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची काेंडी हे नेहमीचेच चित्र झाले आहे. शहरात सध्या नेकलेस राेडवर सिग्नल लावण्यात आले आहेत. मात्र, सिग्नलचे संकेतही दुर्लक्षित करताना अनेक वाहनचालक दिसतात. जर चाैकात पाेलीस उभे असतील तरच सिग्नलला गांभीर्याने न घेणाऱ्या अशा बेबंद वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक झाले आहे. पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेकडून सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू असते. २०२१ या वर्षभरात अधिक गतीने वाहन चालविणाऱ्या ३२ हजारपेक्षा अधिक चालकांना दंड ठोठावण्यात आला तसेच ५,१५० वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांची वाहने जप्त केली आहेत. मात्र, या कारवाईलाही न जुमानणाऱ्या बेदरकार वाहनचालकांमुळे वाहतुकीला शिस्त लागत नाही.
रतनलाल प्लाॅट चाैक
नेकलेस राेडवरील माेठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणारे ग्राहक व या मार्गावरून शहरातील प्रमुख रूग्णालयात जाणाऱ्यांच्या गर्दीने हा चाैक सदैव गजबजलेला असताे. या चाैकात सिग्नल लाल असतानाही अनेकदा वाहनचालक बेदरकारपणे सिग्नलचा संकेत माेडून रस्ता पार करताना दिसतात.
सिव्हील लाईन चाैक
नेहरू पार्ककडून सिव्हील लाईन चाैकात जाणारा मार्गही रहदारीचाच आहे. या चाैकात अनेकांना सिग्नलवर थांबण्यास जणू काही वेळ नसताे. शुक्रवारीही एक तरूणी सिग्नल सुरू हाेण्याची वाट न पाहता सुसाट निघाली. असा प्रकार दिवसभरात अनेकदा दिसताे.
डावी बाजू मोकळी कधी ठेवणार?
रतनलाल प्लाॅट, सिव्हील लाईन चाैकातील सिग्नलवरून डावीकडे वळण्यासाठी सिग्नलची गरज नसते. मात्र, डावीकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी डावी बाजू माेकळी ठेवली पाहिजे, याचे भान अनेक वाहनधारकांना नसते. त्यामुळे डावीकडे जाणाऱ्या बाजूलाही वाहने उभी करून सिग्नल सुरू हाेण्याची वाट पाहणे कधी थांबविणार, हा प्रश्नच आहे.
सगळी जबाबदारी पाेलिसांचीच का?
वाहतूक सुरळीत व्हावी, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, त्यासाठी पाेलिसांनीच दंडुका घेऊन रस्त्यावर उतरावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
प्रत्येकाने नियमांचे पालन केले तर रस्ता सुरक्षेच्या प्रश्नासह वाहतूक काेंडीची समस्या आपाेआप निकालात निघू शकते. यासाठी गरज आहे ती फक्त नियम पाळण्याची.
पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली आहे. ती सुरूच राहील. मात्र, नागरिकांनीही नियमांचे पालन केले तर आपल्याच शहराची वाहतूक सुरळीत व सुरक्षित हाेईल.
- विलास पाटील, पोलीस निरीक्षक