अकोला : लाॅकडाऊनने जिल्ह्यातील उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. कच्चा माल, यंत्रांचे सुटे भाग, कामगार नसल्याने उद्योगक्षेत्राला कोट्यवधींचे नुकसान झाले. लॉकडाऊनला वर्ष पूर्ण होऊनही उद्योगांची चाके रुतलेलीच असून अद्यापही आर्थिक तोट्यातून व्यवसाय उभरला नाही. मार्च २०२१ मध्ये लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असताना, कोरोनाच्या वेदनादायी आठवणींबरोबरच नव्याने सुरू झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाने समाजमन चिंतित झाले आहे. वर्षभरात जिल्ह्याच्या उद्योगक्षेत्राला मोठी हानी सहन करावी लागली. अकोला जिल्ह्यात ७०० ते ८०० मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. त्यांपैकी ५० टक्के उद्योग कृषी आधारित आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये हजारो मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे ६० टक्के मजूर बाहेरगावी अडकून पडले होते. वाहतूक व्यवस्था खोळंबल्याने उद्योगांना कच्चा माल पुरवठा, उत्पादनांचा पुरवठा, पॅकेजिंग, मटेरिअल, यंत्रांचे सुटे भाग मिळणे कठीण झाले होते. मजुरांच्या अभावाने कामाची वेळही कमी झाली. त्यामुळे उत्पादन निर्मिती अर्ध्यावर आली होती. या समस्यांमुळे प्रशासनाची मंजुरी मिळूनही ६० टक्के उद्योग बंद होते. वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा फटका येथील उद्योगांना बसला आहे. हे नुकसान भरून निघायला अजून बराच कालावधी लागणार आहे.
उद्योगांची आर्थिक अडचण
लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेले उद्योग वर्षभरानंतरही आर्थिक अडचणीमुळे बंद आहेत. जवळपास सर्वच उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत.
केवळ २० टक्के वाढीव कर्जाचा दिलासा
उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी शासनाकडून केवळ २० टक्के वाढीव कर्ज देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या गेला; मात्र इतर कुठलेही कर्ज माफ, व्याज माफ अथवा करामध्ये सूट दिली नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजी आहे.
उद्योजकांची आर्थिक हानी भरून निघालेली नाही. अद्यापही उद्योग पूर्ववत सुरू झालेले नाहीत. मध्यंतरी उद्योगाला चालना मिळत असताना पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आर्थिक नुकसान भरून निघायला वेळ लागेल.
- उन्मेष मालू, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन