जिल्हा परीषद आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे अनेक रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत असून, ही मदत मृत्यूनंतर देणार का, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.
बार्शी टाकळी तालुक्यातील कान्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विझोरा येथील दुर्धर आजार असलेल्या दहा ते बारा रुग्णांनी उपचारासाठी आर्थिक मदतीकरिता कान्हेरी सरप प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी दिले होते. दरम्यान, अर्जावर जिल्हा शल्य चिकित्सक यांची सही नसल्याचे कारण समोर करून प्रस्ताव प्राथमिक आरोग्य केंद्रात परत आले होते. परंतु प्रस्तावावर वैद्यकीय अधिकारी यांची सही असल्यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहीची गरज नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर यांनी सांगत, अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पुन्हा हे प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे गेल्यावर मात्र काही तीन-चार रुग्णांना मदत मिळाली. काही रुग्णांना पाच महिन्यांपासून प्रस्ताव सादर केल्यावर त्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही.