अकोला : एसटी महामंडळाने प्रवाशांना गाड्यांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. ज्याद्वारे बस गाड्यांचे लाइव्ह लोकेशन, चालक व वाहकांची नावे आदी माहिती समजणार आहे. सध्या शहरातील आगार क्रमांक २ वर ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (व्हीटीएस) प्रणाली सुरू करण्यासाठी एलइडी लावण्यात आल्या आहे. लवकरच ही सिस्टीम कार्यान्वित होणार आहे. याचीच पुढची पायरी म्हणजे एसटी बसचे लाइव्ह लोकेशन कळण्यासाठी मोबाइल ॲपची निर्मिती करण्यात येत आहे. या ॲपचे लाँचिंग १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार होते; परंतु काही कारणास्तव ते लांबणीवर पडले आहे.
बस कुठे आहे हे आधीच कळणार
ॲपमध्ये गाडीचा क्रमांक टाकून प्रवाशास संबंधित गाडीचे लाइव्ह लोकेशन पाहता येणार आहे. एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत आणि स्थानकावर पोहोचण्यास किती वेळ लागू शकतो आदी माहितीही प्रवाशांना पाहता येणार आहे.
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला, सेवा लांबणीवर!
व्हीटीएसआय प्रणालीद्वारे प्रवाशांना बसच्या लाइव्ह लोकेशनची सेवा देण्यात येणार आहे.
बसस्थानकाव्यतिरिक्त मोबाइलमध्ये ॲपद्वारेदेखील प्रवाशांना ही सेवा मिळणार आहे.
१५ ऑगस्टला या ॲपचे लाँचिंग होणार होते. हा मुहूर्त हुकल्याने सेवा लांबणीवर पडली आहे.
सर्वच बसना बसविली यंत्रणा!
आगार क्र. १ - २६
आगार क्र. २ - ३०
अकोट - ३५
तेल्हारा - १९
मूर्तिजापूर - १७
बसस्थानकात लागले चार मोठे स्क्रिन
व्हीटीएसचे शहरातील बसस्थानकात ४ मोठे स्क्रिन लागले असून प्रवाशांना येणाऱ्या-जाणाऱ्या गाडीची माहिती मिळत आहे. थांबा नसताना थांबा घेतला, गाडी रफ चालविली, विनाकारण ब्रेक लावला, या सर्व बाबी या सिस्टीममुळे स्क्रिनवर दिसतील. शिवाय, या संबंधाची वॉर्निंग बेलही दिली जाते.