बटालियन कॅम्पच्या धर्तीवर वानचे पाणी नेणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:50 AM2020-12-04T04:50:40+5:302020-12-04T04:50:40+5:30
प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर ...
प्रशांत विखे
तेल्हारा: तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेला राज्य राखीव बटालियन कॅम्प अचानक दुसरीकडे हलविल्याचा प्रकार घडला आहे. त्याच धर्तीवर वान धरणाचे पाणी पळवून नेण्याचा डाव तर नाही ना?, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे; मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाणी नेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
तालुक्यात राज्य राखीव बटालियन कॅम्प मंजूर झाला होता. त्यानंतर जागा हस्तांतरणची प्रक्रिया सुरू असतानाच कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते, तर कॅम्प दुसरीकडे गेला नसता. आता वानचे पाणी पेटले आहे. सध्या वानचे पाणी बाळापूरला नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी आरक्षण मंजुरी देण्याचा विषय हा जलसंपदा खात्याकडे असून, या जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडेच ते खाते आहे. पालकमंत्रीसुद्धा धरणात पाणी नसल्याने व स्थानिक शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो, त्यासाठी नवीन कोणतीही पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीत. गतवेळीसुद्धा तालुक्यात राज्य राखिव बटालियन कॅम्प होऊ देण्याचे आश्वासनच नाही, तर मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा दिले होते. तरीही कॅम्प दुसरीकडे हलविण्यात आला. आता शेतकरी धरणातील पाणी जाऊ न देण्यासाठी व अकोला येथील अमृत योजनेसाठी मंजूर झालेले पाणी आरक्षण रद्द करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनासुद्धा निवेदन दिले आहे, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात बैठकांचे आयोजन करून पुढील आंदोलनची रूपरेषा ठरविण्यात येत असल्याचे चित्र आहे.