अकोला : महायुतीचा घटकपक्ष म्हणून शिवसंग्रामने भाजपला प्रामाणिकपणे साथ दिली. भाजपनेही घटकपक्षांना सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. राजी-नाराजीचे अनेक प्रसंग आले; मात्र एकदा साथ देण्याचा निर्णय घेतला, तो कायम ठेवण्याचा संकल्प आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपची साथ सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजप आज सत्तेत नसली तरी आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत, अशी माहिती शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.मेटे शुक्रवारी अकोल्यात आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, की घटकपक्षांना सोबत घेऊन सत्ता सांभाळताना सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील, असे नाही. त्यामुळे अनेक घटकपक्ष त्यांचे नेते किंवा भाजपमधील नेते नाराज होणे स्वाभाविक आहे. आमच्या बाबतीतही नाराज होण्याचे अनेक प्रसंग आले; मात्र नाराजी व्यक्त केली नाही. भाजपला प्रामाणिकपणे साथ देण्याचा संकल्प आम्ही केला होता. तो पाच वर्षे कसोशीने सांभाळला. सत्तेसाठी आम्ही भाजपची साथ केली नव्हतीच. आता भाजप सत्तेत नाही तरीही त्यांना सोडून इतरांकडे जाण्याचा प्रश्नच नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मेटे यांनी सकाळी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे पुत्र अनिल धाबेकर यांचे सांत्वन केले. तसेच शिवसंग्रामचे नेते शिवा मोहोड यांच्या घरी जाऊन त्यांचेही सांत्वन केले. यावेळी शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील, राष्टÑवादी काँग्रेसचे नेते श्रीकांत पिसे पाटील व अजय बिल्लारी उपस्थित होते.