पंतप्रधान मोदी शरद पवारांचे आव्हान स्विकारणार का ? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:25 PM2019-04-05T14:25:21+5:302019-04-05T14:26:14+5:30
राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्विकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदिया येथील प्रचार सभेत तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या दोघांनी तोंड उघडले तर अनेकांचे खरे चेहरे समोर येतील असा गर्भित इशारा कोणाचेही नाव न घेता दिला होता. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील प्रचार सभेत, आमची कळ काढाल तर माफी नाही, असे प्रत्त्युत्तर दिले होते. राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्विकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला. निवडणूक काळात सगळ्यांच्या गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे, सर्वच गोष्टी समोर आल्या पाहिजे, म्हणून पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे आव्हान स्विकारणे गरजेचे आहे, आहे अशी पुष्टीही यावेळी त्यांनी जोडली.
शुक्रवारी अकोला येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सद्या तिहार तुरुंगात कुख्यात डॉन छोटा राजन व अगुस्ता वेस्टलँड हेलीकॉप्टर सौद्यातील आरोपी बंदिस्त आहेत. या दोघांनी तोंड उघडले तर अनेकांचे खरे चेहर समोर येतील, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथील सभेत दिला. भारतातून फरार असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याने शरणागतीचा प्रस्ताव भारत सरकारला दिला होता. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. परंतु, हा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला होता, याचा संदर्भ देताना अॅड. आंबेडकर म्हणाले, की ही बाब दाऊदचा एकेकाळचा हस्तक असलेला व सद्या तिहार तुरुंगात कैद असलेला छोटा राजनच्या तोंडून बाहेर पडेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. तसेच अगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील आरोपीही तीहार मध्ये कैद असून, त्यानेही तोंड उघडले, तर काय होईल, याचाही धसका राकाँ नेत्यांनी घेतला आहे. म्हणूनच उस्मानाबाद येथील प्रचार सभेत शरद पवारांनी मोदींना प्रत्त्यूतर देताना, आमची कळ काढाल तर माफी नाही, असा अप्रत्यक्ष इशाराच मोदींना दिला होता. असे हे ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरु असताना, सर्व सत्य समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे आव्हान स्विकारून तिहारमधील बाबीचा खुलासा करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.