मूर्तिजापूर: गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, या मागणीसाठी तालुक्यातील रोहणा येथील महिलांनी उमा नदीच्या काठावर बुधवारपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.
तालुक्यातील गट ग्रामपंचायत लोनसना अंतर्गत येत असलेल्या ग्राम रोहना येथे पिण्याच्या पाण्याचा व विद्युत पोलवरील लाईटचा प्रश्न अनेक दिवसापासून रेंगाळलेला असल्याचे चित्र दिसत आहे. सदर प्रश्ना बाबत प्राथमिक जबाबदारी असणाऱ्या व भौतिक सुविधांचा कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय यांना अनेकदा तोंडी व लेखी तक्रार दिल्या आहेत. परंतु ग्रामपंचायत कडून कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना किंवा दखल घेतली गेली नाही. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकर द्वारे करत असल्याच्या नावाखाली व हातपंपामध्ये मशीन टाकल्याच्या अशी शासनाची दिशाभूल करून आम्हाला आमच जीवनावश्यक हक्कापासून वंचीत ठेवत असल्याचा आरोप सुद्धा महिलांनी केला आहे. गावापासून दूर असलेल्या उमा नदीमधून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. आता सध्या असलेले पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला दूषित पाणी हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरू शकते किंवा अचानक आलेल्या पुरात पाणी भरतेवेळी वाहून गेले तर याला जबाबदार कोण ?आणि अंधारात साप, विंचू किंवा काही घटना घडल्या तर याची जबाबदारी कोण घेईल ? अनेक प्रश्न उपोषण करणाऱ्या महिलांना पडले आहे. कारण पाण्याची किंमत आणि त्यासाठी होणारी कसरत महिलांनाच माहीत असते म्हणूनच उपोषणाला बसण्याचा महिला वर्गानी दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी संबधित विभागाला पत्र व्यवहार करून निर्णय घेतला होता. परंतु पोलीस प्रशासनाकडून उपोषण स्थगित करण्यात यावे संबंधित विभागाकडून आपला प्रश्न ६ ते ७ दिवसामध्ये मार्गी लागणार असल्याचे लिखित पत्रात म्हटले असल्याने परंतु यावर दिलेल्या मुदतमध्ये प्रश्न मार्गी न लागल्याने आज दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी उमा नदीकाठावर भर उन्हात साखळी उपोषणाला ४० ते ४५ महिलांच्या उपस्थिती मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. जो पर्यंत आमचा प्रश्न पूर्णत्वास जाणार नाही तो पर्यंत लढा कायम ठेऊ असा पवित्रा घेतला आहे. सदर उपोषणाला हम चालीस संघटना मूर्तिजापूरच्या वतीने पाठिंबा देऊन सध्याची परिस्थिती लक्षात घेता संघटनेच्या माध्यमातून उपोषण कर्त्या महिलांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव ,तालुका अध्यक्ष रोहित सोळंके ,बंडूभाऊ डाखोरे, बाळू सरोदे शहाबुद्दीन,सुनील वानखडे यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.