- नीलिमा शिंगणे -जगडअकोला: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पहिल्यांदाच महिला मतदारांमध्ये जागरू कता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने आणि जिल्हा प्रशासनाने नवीन पाऊल उचलले. विधानसभा क्षेत्रनिहाय सखी मतदान केंद्र (आॅल वुमेन पोलिंग बुथ) तयार करण्यात आले होते. अकोला शहरात दोन केंद्र होते. यामध्ये अकोला पश्चिम विभागाकरिता मुंगीलाल बाजोरिया विद्यालय आणि अकोला पूर्व विभागाकरिता सीताबाई कला महाविद्यालय येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी मतदानाला आलेल्या महिलांशी लोकमतने संवाद साधला असता, येथे येऊन अगदी कौटुंबिक सोहळ्यात आल्यासारखं वाटत आहे, असे म्हणाल्या.
या केंद्रामध्ये मतदानासंबंधी सर्व प्रक्रियेचे संचालन महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने केले. केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारीदेखील महिला पोलिसांनीच केली. महिलांनी निर्भिडपणे मतदान केंद्रावर पोहचून मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावावा, हा यामागील उद्देश होता.गुलाबी रंगाने सजले मतदान केंद्रसखी मतदान केंद्र संपूर्ण गुलाबी आणि पांढऱ्या रंगाने सजविण्यात आले होते. गुलाबी आणि पांढºया रंगाच्या फुग्यांनी संपूर्ण परिसर फुलून गेला होता. केंद्रातील महिला अधिकारी आणि त्यांना सहकार्य करणाºया सर्व महिलांनी गुलाबी साड्या परिधान केल्या होत्या. सीताबाई कला महाविद्यालय केंद्राने यामध्ये बाजी मारली होती. अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. पाहता क्षणीच कुठल्या लग्नसमारंभात आल्यासारखे भासत होते.
सेल्फी पॉइंटमहिलांचा व तरुणाईचा मतदानाबाबत उत्साह वाढविण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. सीताबाई महाविद्यालयात महाराष्ट्रीय वेशभूषेतील स्त्री व पुरुषांचे कटवर्क ठेवण्यात आले होते. महिलांनी, युवतींनी तसेच पुरुषांनादेखील येथे सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
हिरकणी कक्षस्तनदा मातांकरिता हिरकणी कक्षाची सखी मतदान केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. महिलांना बसण्याकरिता येथे सोफा आणि खुर्चा ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय खेळणी, पिण्याचे पाणी, प्रसाधन गृहाचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.बालसंगोपनचा फक्त फलकमनपा शाळा क्रमांक एक येथे केवळ विश्रांती व बालसंगोपनचा फलक लावण्यात आला होता; मात्र या ठिकाणी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. खरे तर या भागातील महिलांना सखी केंद्राची प्रकर्षाने आवश्यकता होती. हिरकणी कक्ष फक्त नावालाच होता.