Women's Day Special : या कुटुंबात गृहिणीला मिळते साप्ताहिक सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 12:08 PM2021-03-08T12:08:00+5:302021-03-08T12:18:46+5:30
Women's Day Special : गृहिणीला साप्ताहिक सुटी देऊन खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्याचा संकल्प देशमुख कुटुंबीयाने घेतला.
- राजू चिमणकर
अकाेला : दरवर्षी जागतिक महिला दिन हाेताे, यानिमित्ताने कर्तबगार महिलांचा सत्कारही हाेताे मात्र घरात रात्रंदिवस राबणारी गृहिणी मात्र दुर्लक्षितच राहते. मात्र याच गृहिणीला साप्ताहिक सुटी देऊन खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्याचा संकल्प देशमुख कुटुंबीयाने घेतला. गृहिणीला आठवड्यातून एक दिवस रजा देणे आणि तिची कामे घरातील पुरुषांनी वाटून घेऊन पार पाडणे ही खरोखरच अभिनव कल्पना आहे. देशमुख कुटुंब ज्या अभिनव पद्धतीने जागतिक महिला दिवस साजरा करते आणि घरातील गृहिणीला साप्ताहिक सुटीची सुविधा उपलब्ध करून देते त्यांची ही कृती खरोखरच अनुकरणीय आहे.
विजय देशमुख हे मूळचे अकोला तालुक्यातील उगवा येथील शेतकरी. शेतीवरच या कुटुंबाची गुजराण चालते. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले आणि अकोला येथे भाड्याने राहू लागले. अख्ख्या घरावरच आधीपासून संस्काराची छाप पडलेली. नवरा घरी आला म्हणजे त्याला बायकोने पाण्याचा ग्लास दिला पाहिजे हा नियम यांनी मोडीत काढला. इतकेच नव्हे तर मुलांवरही आत्मनिर्भरतेचे संस्कार केले. आज घरात कुणी कुणाला पाणी न मागता स्वतःचा ग्लास हातो भरून घेतात. स्वतःचे ताट स्वतः वाढून घेतात आणि जेवणानंतर पाण्याने विसळूनही घेतात.
सन २०११ च्या जागतिक महिला दिनापासून या बाप-लेकांनी आणखी एक पुढचे पाऊल उचलले आणि घरच्या गृहिणी अश्विनी यांना विकली ऑफ अर्थात साप्ताहिक सुटी देण्याचा निर्णय घेतला. साधारणत: रविवारी हा विकली ऑफ असतो. रविवारी जमले नाही तर लगतच्या दिवशी विकली ऑफ घोषित केला जातो. ज्या दिवशी घरच्या गृहिणीची साप्ताहिक सुटी असेल त्या दिवशी विजय देशमुख आणि त्यांची मुले पौरस आणि श्रीराज हे मिळून घरातील सर्व कामे करतात. यादिवशी घरच्या गृहिणीला आराम असतो.
अशी मिळाली प्रेरणा
सन २००९ ची गोष्ट आहे. त्या दिवशी ८ मार्च अर्थात जागतिक महिला दिवस होता. महिला दिनाच्या बातम्या वाचून विजय देशमुख आणि त्यांचा मुलगा पौरस यांनी घरची गृहिणी अर्थात पौरसची आई अश्विनी यांना त्या दिवशी सुटी देऊन त्यांचे सर्व कामे स्वतः करून घरच्या घरी महिला दिवस साजरा करण्याचे ठरविले. वडील आणि मुलांनी मिळून घरातली सर्व कामे त्या दिवशी केलीत. घरच्या घरी कणकेचा केकदेखील तयार केला आणि घरच्या गृहिनी अश्विनी यांना त्या दिवशी चक्क आराम करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन अभिनव पद्धतीने घरच्या घरी महिला दिवस साजरा केला.
माजी मुख्यमंत्र्यांनी केले उपक्रमाचे काैतुक
अश्विनी या मूळच्या बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडीसूत्रक गावच्या. इंडियन नेव्हीमध्ये नेव्हल ऑफिसर म्हणून काम करणारे गौतमदादा जगताप यांच्या त्या सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित कन्या! मोकळा मिळालेला वेळ अश्विनी त्यांचा छंद जोपासण्यासाठी, आवडीचा चित्रपट पाहण्यासाठी, मैत्रिणींच्या भेटी घेण्यासाठी, आवडीची पुस्तके वाचण्यासाठी वापरतात. या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उगवा येथे घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले होते.