अकोला: सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुढे करून शहरी नागरिकांची डोकी भडकविण्याचे काम मोदी, फडणवीस करीत आहेत. हत्यारे सापडलेल्या सनातन्यांवर कारवाई करण्यातही कुचराई केली जात आहे, हा दुटप्पीपणा समजून आता नागरिकांनी देशाला वाचविण्यासाठी सरकारला धडा शिकवायला हवा, असे आवाहन भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. शासकीय विश्रामगृहात शनिवारी सायंकाळी त्यांनी विविध मुद्यांवर पत्रकारांना माहिती दिली.शहरी नक्षलवादी म्हणून मुंबई पोलिसांनी कारवाई केलेल्या लोकांकडे कोणतेच हत्यार सापडलेले नाही. त्याचवेळी सनातन्यांकडे बंदुका, बॉम्ब, हत्यारे सापडली. त्यांना पाठीशी घातले जात आहे. आतापर्यंत सापडलेले सर्व हत्यारधारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले आहेत. त्यांच्या हत्यारांचाही लोकांवर परिणाम होत नाही, असे दिसत असल्याने शहरी नक्षलवादाची संकल्पना मांडली जात आहे, तर हत्यार न सापडलेल्यांना शहरी नक्षलवादी म्हणून नागरिकांची डोकी भडकविली जात आहेत. शहरी नक्षलवादी कोण आहेत, हे न ठरविताच नक्षलवादाचा मुद्दा लोकांपुढे नेला जात आहे. हा प्रकार मोदी, फडणवीस यांना वेडाचे झटके आल्यासारखा आहे, असा घणाघातही अॅड. आंबेडकर यांनी केला.देशात सर्वच स्तरावर ब्लॅकमेलिंगची राजनीती सुरू आहे. ५०० कोटींपर्यंत मालमत्ता असलेल्या ७५ हजार कुटुंबांनी देश सोडून इतर देशात स्थायिक होणे पसंत केले आहे. सरकारच्या जाचाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्या कुटुंबांना स्थानिक पोलीस, आयकर विभाग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालयाकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी देश सोडल्याचेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, सिद्धार्थ सिरसाट, पराग गवई, पुरुषोत्तम अहिर, महादेव सिरसाट व विलास जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील भाजप फायनान्सवरही कारवाईभाजपला अर्थ पुरवठा करणाºया अकोल्यातील एकावर काही दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाकडून कारवाई करण्यात आली. त्यातून संबंधिताला दमबाजीही करण्यात आली. या दमबाजीच्या राजकारणाने देशाचे नुकसान होत आहे. जे ७५ हजार कुटुंबे देशाबाहेर गेले, त्यांनी देशातील संपत्ती विकली. त्याचे रूपांतर डॉलरमध्ये केले. त्यामुळे डॉलरचा तुटवडा निर्माण झाला.परिणामी, डॉलरची किंमत वाढली. त्यातूनही देशाचे नुकसान झाल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.
१२ मतदारसंघांची मागणीकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षाशी युती व्हावी, ही आमची भूमिका आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसकडे ३७ जागांवर प्रभावी उमेदवार नाहीत. त्यापैकी केवळ १२ जागांची आमची मागणी आहे. आमचा कोणताही उमेदवार निवडणूक न लढताही आघाडीसाठी तयार आहे; मात्र अजेंड्यावर बोलणी करण्यासाठी कोणीही तयार नसल्याची वस्तुस्थिती आहे, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.