लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जठारपेठ परिसरातील ज्योती नगरातील सिद्धिविनायक मंदिर चौकात अज्ञात व्यक्तीने जादूटोण्याचा प्रकार केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तसेच कोरोना विषाणूला पळविण्यासाठी ही पूजा करण्यात आली की काय, याविषयी परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.ज्योती नगरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ राहणारे श्रीकृ ष्ण सागळे यांच्या घरासमोरील गेटजवळ अज्ञात व्यक्तीने एका कागदामध्ये लिंबू, दिवा, अंडे आणि धागेदोरे आणून पूजा करण्याचा प्रयत्न केला; परंतु काही नागरिक येण्याची चाहूल लागल्यामुळे त्या अज्ञात व्यक्तीने हे साहित्य घटनास्थळावरून पळ काढला. अंधार असल्यामुळे तो व्यक्ती दिसून आला नाही. शुक्रवारी अमावस्या, पौर्णिमेचा दिवस नसतानाही त्या व्यक्तीने ही पूजा कशासाठी आरंभिली होती, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.कोरोनासारख्या महामारीला पळविण्यासाठी ही पूजा मांडण्यात तर मांडण्यात आली नाही, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. ही पूजा करण्यामागे त्या अज्ञात व्यक्तीचा काय उद्देश होता, हे सांगणे कठीण आहे. याबाबत लवकर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात येणार आहे. एकंदरीत झालेल्या जादूटोण्याच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)
‘कोरोना’ला पळविण्यासाठी केली ‘पूजा’; नागरिक भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:38 AM