निराधार कृष्णासाठी प्रतिभा झाली ‘यशोदा’; पाच वर्षांपासून उपचार घेत असलेल्या मुलास दिला आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:14 AM2018-01-02T02:14:21+5:302018-01-02T02:15:00+5:30
अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘कृष्णा’ला आणि सर्व रुग्णालयालाच आली. गत पाच वर्षांपूर्वी झाडावरून पडल्याचे निमित्त होऊन लुळापांगळा झालेल्या वाशिम जिल्हय़ातील कृष्णा किशोर पवार याला मदतीचा हात देऊन जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार या त्याच्यासाठी ‘यशोदा’ ठरल्या.
अतुल जयस्वाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कृष्णाला जन्म देवकीने दिला असला, तरी त्याचे पालनपोषण मात्र यशोदेने केले. त्यामुळे जन्म देणार्यापेक्षा पालनपोषण करणारी माता श्रेष्ठ मानली जाते. अशीच काहीशी प्रचिती अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘कृष्णा’ला आणि सर्व रुग्णालयालाच आली. गत पाच वर्षांपूर्वी झाडावरून पडल्याचे निमित्त होऊन लुळापांगळा झालेल्या वाशिम जिल्हय़ातील कृष्णा किशोर पवार याला मदतीचा हात देऊन जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार या त्याच्यासाठी ‘यशोदा’ ठरल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशी १७ वर्षीय कृष्णाच्या आयुष्यातील पहिला आणि सवरेपचार रुग्णालयातीलही बहुधा पहिलाच वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाशिम जिल्हय़ातील मालेगाव येथील कृष्णा किशोर पवार हा मुलगा वर्ष २0१३ मध्ये शेळय़ांसाठी चारा तोडताना झाडावरून पडला. या घटनेने त्याचे आयुष्यच बदलून गेले. जखमी झालेल्या कृष्णाला त्याच्या आईने अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात आणले. वडील नसल्यामुळे कृष्णा हाच तिच्यासाठी सर्व काही होता. झाडावरून पडल्यामुळे झालेल्या गंभीर जखमा भरून निघत नव्हत्या. अशातच त्याची शुश्रूषा करताना रुग्णालयातच आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून कृष्णा रुग्णालयाच्या १२ क्रमांकाच्या वॉर्डात भरती आहे. एक दिवस रुग्णांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार व त्यांचे पती प्रभाकर अवचार यांना कृष्णा दिसला व त्यांनी कृष्णाला मदत करण्याचा निर्णय घेतला. कृष्णाला झालेल्या जखमा चिघळल्याने त्याच्या जवळही कोणीही फिरकायला तयार नसायचे. अशात प्रतिभा अवचार यांनी त्याच्यावर उपचार करणारे डॉ. कृष्णा केसान, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. विरवाणी यांच्याशी चर्चा करून त्याला मुंबई येथील इस्पितळात नेले. तेथे उपचार केल्यानंतर कृष्णाच्या जखमा भरून निघाल्या, तरी त्याला कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे त्याला पुन्हा सवरेपचार रुग्णालयात ठेवण्यात आले. तेव्हापासून प्रतिभा अवचार या नियमितपणे कृष्णाला भेटण्यासाठी येतात. कृष्णालाही त्याचा लळा लागला आहे. तो अवचार दाम्पत्यास आई-बाबा म्हणतो. वार्ड क्र. १२ हे त्याचे घरच झाले असून, या ठिकाणी कार्यरत असलेल्या परिसेविका गोदावरी कलोरे, विजया बोळे, मीना तारणेकर, सूर्यकांता अडबोल, सफाई कर्मचारी विश्रांती कांबळे, संतोष इंदूरकर हे त्याची शुश्रूषा करीत आहेत. रुग्णालयात डबे पुरविणार्या रुखसाना या दररोज त्याच्यासाठी विनामूल्य जेवण आणतात.
वॉर्ड बनला ‘बर्थडे हॉल’
सोमवार, १ जानेवारी रोजी अवचार दाम्पत्याने कृष्णाचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या आयुष्यातील हा पहिलाच वाढदिवस होता. यावेळी वॉर्ड क्र. १२ ला बर्थ डे हॉलचे रूप आले होते. कृष्णाने केक कापला व पहिला घास आपल्या ‘यशोदे’ला भरविला. यावेळी कृष्णाच्या डोळय़ात आनंदाश्रू तरळले होते. थोडा वेळ त्याच्या चेहर्यावरील दुख: मावळतीला जाऊन हास्याची लकेर उमटली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, मनपा गटनेता गजानन गवई, प्रभाकर अवचार, सिद्धार्थ सिरसाट, सुरेंद्र तेलगोटे, वसंत मार्के, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पांडव, विजय राठोड, ओम उजवणे, रुग्णालयातील कर्मचारी वृंद व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.