लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उत्पादनाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, नाफेडच्या अटींमुळे नागवल्या जाणार्या शेतकर्यांच्या समस्यांवर शासनाने उपाययोजना केल्याचा निरोप प्रशासनाकडून न आल्याने जाब विचारण्यासाठी निघालेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेतकरी जागर मंचच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेकडो कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली. दारिद्रय़, विविध समस्यांनी घेरलेल्या शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचने गांधी-जवाहर बागेतून मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात तेथे ठिय्या देण्यात आला. विविध मागण्यांवर शासनाने काय केले, याबाबतची चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे जाऊ द्या, अन्यथा त्यांना येथे बोलवा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी दुपारी ३.४0 वाजता आंदोलकांची भेट घेतली. जिल्हाधिकार्यांनी मागण्यांबाबत चर्चा करताच शेतकर्यांनी चांगलाच गदारोळ केला. त्यावर त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचे आवाहन सिन्हा यांना करावे लागले. कर्जमाफीची आकडेवारी सादर करण्याशिवाय इतर मागण्या शासन धोरणाशी संबंधित आहेत. त्यावर आपण बोलू शकत नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलकांचे समाधान झाले नाही. जिल्हाधिकारी आल्या पावली परत गेले. दरम्यान, सिन्हा यांनी राज्य शासनाला एक तासाचा अल्टिमेटम देत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. दुपारी चार ते पाच या काळात तेथेच ठिय्या देत शासनाच्या निरोपाची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी दिला. सोबतच त्यानंतर शेतकरी काहीही करण्यास मोकळे असल्याचा इशाराही दिला. शासनाकडून पाच वाजेपर्यंत कोणताही निरोप मिळाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना भेटून शासनाची भूमिका समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाण्याची तयारी केली. त्याचवेळी पोलिसांनी यशवंत सिन्हा यांच्यासह सर्व आंदोलकांना अटक केल्याचे सांगितले. त्या सर्वांना वाहनातून पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये शेतकरी जागर मंचचे संयोजक जगदीश मुरूमकार, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे, ज्ञानेश्वर सुलताने, मनोज तायडे, सम्राट डोंगरदिवे, धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, दिनकर वाघ, दिलीप मोहोड, श्रीकृष्ण ढगे यांच्यासह शेकडो शेतकर्यांचा सहभाग होता. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात महादेवराव भुईभार यांच्यासह मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.
रात्री उशिरापर्यंत प्रशासनाशी चर्चामाजी केंद्रीय अर्थमंत्री यशंवत सिन्हा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह अटक झालेले शेकडो शेतकरी पोलीस मुख्यालयातच थांबले. रात्री नऊनंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू केली. आंदोलनकर्त्यांच्या पाच मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकार्यांनी दिल्यावर यशंवत सिन्हा यांनी हे पत्र म्हणजे ‘चॉकलेट’ आहे, अशी संभावना करून ते अमान्य केले. नाफेडने सुरू केलेल्या धान्य खरेदीमधील जाचक अटी आधी खारीज करा; अन्यथा आम्ही येथून जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यशवंत सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या आंदोलनाला सर्मथन दिले. अकोल्यातील स्थानिक काँग्रेसचे नेत्यांनीही आंदोलनस्थळी धाव घेत यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही आंदोलनस्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत प्रशासनासोबत चर्चा सुरू होती. मात्र, सिन्हा यांच्यासह आंदेालनकर्ते आपल्या मागणीवर ठाम असल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. -