यंदा समाधानकारक पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:09 PM2019-04-06T14:09:20+5:302019-04-06T14:09:26+5:30
राज्याच्या इतर भागातही पोषक वातावरण असल्याने यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर.एन. साबळे यांनी शुक्रवारी खास लोकमतशी बोलताना वर्तविला.
अकोला: वºहाडातील अकोला जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदविण्यात आले. हे तापमान मान्सूनला पोषक ठरणार आहे. राज्याच्या इतर भागातही पोषक वातावरण असल्याने यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर.एन. साबळे यांनी शुक्रवारी खास लोकमतशी बोलताना वर्तविला.
खासगी हवामानशास्त्र विभागांनी वर्तविलेल्या अंदाजानंतर डॉ. साबळे यांनी शेतकऱ्यांना ही आनंदाची माहिती दिली. मागील काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण घटले असून, मागील दोन वर्षांपासून तर हे प्रमाण खूपच कमी झाले. या पृष्ठभूमीवर यावर्षी चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तथापि, यावर्षी ‘एल निनो’चा प्रभाव असल्याने मान्सूनवर त्यांचा प्रतिकूल परिणाम होण्याच्या शक्यताच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी धास्ती घेतली म्हणूनच आपणही यावर्षीच्या हवामानाचा अभ्यास केला असता एल निनोचा देशावर कोणताही परिणाम जाणवणार नसून, मान्सूनला वातावरण अनुकूल असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
वर्तमान स्थितीत हवेचा दाब कमी होण्यास सुरुवात झाली असून, भिरा, अकोला, मालेगाव, चंद्रपूर येथील कमाल तापमान ४२ ते ४३ अंशांच्या पुढे नोंदविले जात आहे. या चारही शहरातील कमाल तापमान गेले १० ते ११ दिवस सातत्याने सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले असून, हे तापमान दमदार पावसासाठी पोषक असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अरबी समुद्रावरून वारे वाहू लागले आहेत. अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वाºयाचा प्रवास सुरू झाला असून, नैर्ऋत्य दिशेने वारे वाहत असल्याने राज्यात समाधानकारक पावसाबरोबरच मान्सूनदेखील वेळेवरच दाखल होणार आहे. समाधानकारक पाऊस पडेल, हा पूर्व अंदाज असून, १५ मेनंतरच राज्याच्या कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याबाबतचा तपशील कळू शकेल, असेही डॉ. साबळे म्हणाले.