फुकट दारु दिली नाही म्हणून युवकाची भोसकून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:48 PM2018-11-23T13:48:44+5:302018-11-23T13:49:37+5:30
अकोला : लहान उमरीतील सचिन पंत नामक इसमाच्या दारू दुकानावर कामावर असलेल्या एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.
अकोला : लहान उमरीतील सचिन पंत नामक इसमाच्या दारू दुकानावर कामावर असलेल्या एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर युवकाला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले.त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास युवकाचा मृत्यू झाला.
देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी गेलेल्या गुंडाने फुकटात दारू मागितली; मात्र कामगाराने नकार दिल्यानंतर त्याला चाकूने भोसकले. त्यात कामगाराचा मृत्यू झाला. श्रीकांत कृष्णराव सोनुकुले (वय ३७, रा. लहान उमरी) असे मृतक मजुराचे नाव आहे. श्रीकांत सोनुकुले हे लहान उमरीतील सचिन पंत यांच्या देशी दारूच्या दुकानात काम करतात. सकाळी १० वाजताच्या सुमारास ते दुकानात कामाला आले. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या दुकानात रणजित वाघ हा गुंड प्रवृत्तीचा युवक नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी आला. त्याने श्रीकांत सोनुकुले यांना फुकटात दारू मागितली. आधी पैसे दे म्हणताच आरोपी रणजित वाघने श्रीकांत सोनुकुले यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आरोपी दुकानाच्या बाहेर गेला आणि काही वेळाने पुन्हा आल्यानंतर श्रीकांत यांच्या पोटात चाकूने सपासप वार केले. श्रीकांत त्याला प्रतिकार करण्यापूर्वीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गंभीर जखमी असलेल्या श्रीकांत सोनुकुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झााला. या घटनेची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार वसंत मोरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर आरोपी रणजित वाघ याची माहिती घेऊन त्याला तातडीने शोधून ताब्यात घेतले. रणजित वाघविरुद्ध सुरुवातीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता; मात्र सायंकाळी श्रीकांत यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकांत सोनुकुले चालवायचे चहा टपरी
श्रीकांत सोनुकुले यांची स्वत:ची सातव चौक परिसरात चहा टपरी होती. १० ते १५ दिवसांपूर्वीच सचिन पंत नामक दारू विक्रेत्याने श्रीकांत सोनुकुले हे निर्व्यसनी आणि प्रामाणिक असलेल्या श्रीकांत सोनुकुलेमुळे देशी दारूचे दुकान चांगले चालेल व लक्ष ठेवायचे काम नाही, या उद्देशाने पंत यांनी त्यांना कामाला ठेवले; मात्र याच दारू दुकानाने त्यांचा बळी घेतल्याची चर्चा होती.