लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: युवक काँग्रेस नव्या जोमाने २०२२ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरणार असून, यासाठी तरुणांना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरुणाची नेतृत्व क्षमता तयार करण्यासाठी प्रदेश स्तरावर युवा जोडो अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याला युवा शक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.शासकीय विश्रागृह येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी युवा जोडो अभियानाची माहिती दिली. राज्यात महाविकास आघाडीचे शासन असून, शासनाने युवा विकासासाठी अनेक नवयोजना सुरू केल्या आहेत. युवक काँग्रेसचे सहा लोकप्रतिनिधी विधिमंडळात असून, हा आलेख उंचावण्यासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या तळागाळात जाऊन लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन तांबे यांनी केले. युवक काँग्रेस संघटना सक्रिय क ाम करीत आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अकोला जिल्हा पुन्हा काँग्रेसमय कसा करता येईल, यादृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. अकोल्यातील जनतेने यंदाच्या निवडणुकीत जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन काँग्रेसला मते दिली आहेत. काँग्रेसला मानणारा वर्ग अकोल्यात आहे. आम्हीच कुठेतरी कमी पडलो. यासाठी नव्या ऊर्जेने युवा वर्गाच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली असल्याचे तांबे म्हणाले.महाराष्ट्र विकास आघाडीमुळे एखादा विद्यार्थी एटीकेटी घेऊन जसा पास होतो, त्याप्रमाणेच काँग्रेसला पुढच्या वर्गात जाण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकासात्मक काम करण्यासाठी युवा काँग्रेस संघटनेने पूर्ण ताकदीने उभे राहायला पाहिजे. २०१९ ची विधानसभा निवडणूक जिंकू शकलो असतो; मात्र ६० पैकी २०-२५ जागा मित्रपक्षाला गेल्या. काही तडजोडीत जागा गेल्या. तसेच पाहिजे तेवढे उमेदवार गंभीर नव्हते. ही परिस्थिती बदलायची असेल, तर त्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासून केली पाहिजे. युवा काँग्रेसने अनेक उपक्रम सुरू केले आहेत.यापैकी वक्तृत्व स्पर्धा. यामधून युवा तडफदार प्रवक्ते काँग्रेसला मिळणार आहेत. जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. अकोलासह राज्यातील बेपत्ता अल्पवयीन मुली आणि युवतींचा प्रश्न गंभीर असून, यासाठी युवक काँग्रेस ताकदीने लढणार आहे. महानगरपालिका संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी प्रत्येक वॉर्डात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषदेला साजीद पठाण, कपिल ढोके, अंशुमन देशमुख, प्रदीप वखारिया, अॅड़ महेश गणगणे व आकाश कवडे उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर युवा काँग्रेसचा ‘फोकस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 2:02 PM