शून्य ऊर्जा प्रकल्पातून शेतीला मिळते २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 01:40 PM2020-03-09T13:40:06+5:302020-03-09T13:40:14+5:30

५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे

From the Zero Energy Project, the farm gets 24 hours of water | शून्य ऊर्जा प्रकल्पातून शेतीला मिळते २४ तास पाणी

शून्य ऊर्जा प्रकल्पातून शेतीला मिळते २४ तास पाणी

googlenewsNext

- संतोषकुमार गवई
शिर्ला: मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी परिसरात ३०० एकर शेतीवर विजेशिवाय सिंचन करणे शक्य झाले आहे. गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. हिंमतराव टप्पे आणि अभियंता हरिदास ताठे तथा ५१ शेतकऱ्यांच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक सहभागामुळे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.
अभियंता हरिदास ताठे आणि हिंमतराव टप्पे यांच्या ३६५ दिवसांच्या अथक परिश्रमातून मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कोठारी गावाच्या शेतीपर्यंत धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे पारंपरिक पद्धतीने न आणता थेट शेतकºयांच्या शेतापर्यंत पाइपलाइनद्वारे पोहोचविण्यात आले आहे. त्यामुळे ७० टक्के पाण्याची तथा शंभर टक्के विजेची बचत करून शून्याधारित ऊर्जेवर सदर प्रकल्प सुरू आहे. ५१ शेतकºयांच्या वैयक्तिक आर्थिक सहभागातून तथा शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीशिवाय सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपये खर्च आला आहे. सध्या या प्रकल्पाचे पाणी मोर्णा धरणापासून थेट कोठारी गावापर्यंत यशस्वीपणे पोहोचले आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक शेतकºयाच्या बांधापर्यंत तुषार संच ठिबक सिंचन अथवा प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी पोहोचले जाणार आहे. कोठारी येथे १२० हेक्टरवर संत्रा, मोसंबीच्या बागा आहेत. धरणाच्या पायथ्याशी असूनही गत दोन वर्षांपूर्वी या भागांना योग्य वेळी पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या होत्या. शेतीनिष्ठ शेतकरी हिंमतराव टप्पे यांनी सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्था स्थापन करून पाटबंधारे विभागाशी करार केला. त्याला कार्यकारी अभियंता वाकोडे, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, शाखा अभियंता गजानन अत्तरकार यांनी मोलाची साथ दिली. शून्य ऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारण्यासाठी अभियंता हरिदास ताठे यांची भेट घेतली आणि मोर्णा धरणातून थेट कोठारी गावापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटर पाणी आणण्याचे ठरविले; मात्र यासाठी लागणारा १ कोटीहून अधिक निधी कसा उभा करावा, असा प्रश्न या दोघांसमोर उभा राहिला. बँकांनी नकार दिल्यानंतर ५१ शेतकºयांची बैठक घेतली आणि बहुतांश निधी वैयक्तिक स्तरावर उभा करण्यात आला; मात्र बुलडाणा अर्बन या बँकेने मदत दिल्याने प्रकल्प यशस्वी झाला.

पाण्यासह पैशांची बचत
कॅनॉलचे पाणी हे हंगामी पद्धतीने मिळते. यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. दुसरीकडे पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने अपव्यय कमी होतो. तसेच जेव्हा हवे असेल तेव्हा पाणी पुरवठा करू शकतो. पाणी वाटपासाठी कर्मचाºयांची गरज नाही, कॅनॉलप्रमाणे दुरुस्ती देखभाल करावी लागत नाही, पाण्याची मागणी करावी लागत नाही, प्रत्येक शेतकºयाची वेगवेगळी गरज लक्षात घेता सोयीनुसार पाणी पुरवठा शक्य झाला आहे. प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था असल्यामुळे सिंचनात कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे.

 

Web Title: From the Zero Energy Project, the farm gets 24 hours of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.