जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्याही बारगळल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:19 AM2020-08-10T10:19:50+5:302020-08-10T10:20:36+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रिया न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रिया न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) ७ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे कोरोना काळात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदल्याही आता बारगळल्या आहेत.
शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅफलाइन सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया राबविण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली होती; परंतु शिक्षकांच्या बदली प्रक्रियादरम्यान होणारी मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया करण्यात येऊ नये आणि शिक्षकांच्या विनंतीवरील बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनाद्वारे घेण्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ५ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रिया करण्यात येऊ नये, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने व शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पत्राद्वारे मांडली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदल्या न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे, असे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्यामार्फत ७ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले. त्यामुळे कोरोना काळात जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांसह आता विनंतीवरील बदल्यादेखील बारगळल्या आहेत.
विनंती बदल्यांसाठी १४६ शिक्षकांचे अर्ज!
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील १४६ प्राथमिक शिक्षकांनी विनंतीवरील बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज केले होते; परंतु कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदल्यांची प्रक्रियादेखील आता लांबणीवर पडली आहे.