धारणी (अमरावती) : तालुक्यातील खारी येथे १० वर्षीय बालकाची काकाने धारधार शस्त्राचा वापर करून हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. त्याने मृतदेहासह स्वत:ला गावातील मंदिरात कोंडून घेतले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना नागरिकांनी आरोपीला ताब्यात मागितले. यावेळी झालेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. योगेश वासुदेव येवले (१०) असे मृताचे, तर धन्नालाल श्यामलाल येवले (३२) असे आरोपी काकाचे नाव आहे. योगेश हा सायंकाळी सातच्या सुमारास ग्रामदैवत असलेल्या शिंगाजी मंदिरात काही मित्रांसमवेत दिवे लावण्यासाठी गेला होता. त्यांच्या पाठोपाठ धडकलेल्या धन्नालालने सुतारकामात वापरावयाच्या वासल्याने मानेवर वार करीत त्याची हत्या केली. या घटनेने घाबरलेल्या मुलांनी तेथून पळ काढला. यानंतर धन्नालालने मंदिराचे चॅनेल गेट लावून मृतदेहासह स्वत:ला बंदिस्त केले. ग्रामस्थांना याबाबत माहिती होताच त्यांनी मंदिर गाठले. मात्र, धन्नालाल सशस्त्र असल्याने कुणी पुढे गेले नाही. दरम्यान, धारणी पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार किशोर गवई हे पोलीस ताफासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवून धन्नालालला ताब्यात घेतले. त्याला बाहेर आणत असतानाच नागरिकांनी त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली आणि पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस वाहनाच्या काचा फुटल्या व शिपाई नंदकिशोर पाडमासे जखमी झाले. आरोपीला धारणीला आणत असताना वाटेत एसडीपीओ विशाल नेहुल यांचा ताफा मिळाला. त्यांच्या वाहनातून आरोपीला धारणीत आणण्यात आले. यानंतर पुन्हा एसडीपीओ विशाल नेहुल, ठाणेदार किशोर गवई यांनी खारी गाव गाठून तेथील तणाव निवळला. वृत्त लिहिस्तोवर घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. ------आधीही मारण्याचा प्रयत्न धन्नालाल हा कधीकधी विक्षिप्त वागतो. त्याने या विक्षिप्तपणातून आठ वर्षांपूर्वी योगेशला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती पुढे आली आहे.
१० वर्षीय बालकाची काकाने धारधार शस्त्रानं केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:01 PM