११ कोटींची थकबाकी, थकीत वीज बिल भरायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:31+5:302021-02-16T04:14:31+5:30
२३ हजार ग्राहकांचा सवाल : पाचशे ग्राहकांचा पुरवठा खंडित मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : झोपडीत राहून कोरोनाकाळात कशीबशी तग धरून ...
२३ हजार ग्राहकांचा सवाल : पाचशे ग्राहकांचा पुरवठा खंडित
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : झोपडीत राहून कोरोनाकाळात कशीबशी तग धरून असलेल्या मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की अवाढव्य वीज बिल भरून रात्रीचा अंधार दूर करायचा, हा प्रश्न धामणगाव रेल्वे तालुक्यातील २३ हजार वीज ग्राहकांपुढे उभा ठाकला आहे. वीज बिल न भरल्याने पाचशे ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
तालुक्यातील २३ हजार वीज ग्राहकांकडील थकीत ११ कोटी ७८ लाखांच्या वीज देयकांच्या वसुलीसाठी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू केले आहे. गत मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे महावितरणने मीटर रीडिंग न घेता ग्राहकांना मार्च, एप्रिल, मे महिन्यांतील सरासरी वीज बिल ग्राहकांना दिले. ही बिले वाढीव आणि अव्वाच्या सव्वा रकमेची आहेत. कोणत्या आधारे ही सरासरी काढून बिले दिली, याचे उत्तर अनेक ग्राहकांना मिळालेले नाही. विशेष म्हणजे, झोपडीत दोन प्रकाशदिव्यांचा वापर असलेल्या ग्राहकांना कुठे चार हजार, तर कुठे आठ हजार असे बिल आले आहे. हे एवढ्या रक्कमेची वीज बिल भरायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.
-------------------धामणगाव तालुक्यात जानेवारी महिन्यापर्यंत थकबाकी अशी
वितरण केंद्र ग्राहक थकबाकी धामणगाव शहर ४६१० २ कोटी ८४ लाख
धामणगाव ग्रामीण भाग १ २९७० १ कोटी ४० लाख
धामणगाव ग्रामीण भाग २ ३१११ १ कोटी २८ लाख
तळेगाव दशासर ३६०० १ कोटी ६१ लाख
मंगरूळ दस्तगिर भाग १ २९०० १ कोटी २६ लाख
मंगरूळ दस्तगिर भाग २ २५८४ १ कोटी १० लाख रुपये
अजनसिंगी ३९५० १ कोटी ६२ लाख
औद्योगिक वापर २९२ ६३ लाख
-----------------
टप्प्याटप्प्याने वीज बिल भरण्यास मुभा
ग्राहकाकडे थकीत असलेली रक्कम एकाच वेळी भरता येत नसेल, तर आता प्रत्येक ग्राहकाला वीज बिल टप्प्याटप्प्याने भरता येणार आहे. प्रत्येक ग्राहकाला ऑनलाइन एसएमएस जाणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
------------------
कोरोना काळात वीज बिल माफ करणार, असा शब्द शासनाने दिला होता. आता थकबाकीदारांचा वीजपुरवठा युद्धस्तरावर खंडित करणे सुरू आहे. शासन गरीब जनतेचा किती अंत पाहणार? कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, सक्तीने वीज बिल वसुली करू नये.
- सत्यभामा कांबळे, सरपंच, जळगाव आर्वी
----------------
ग्राहकांना कोरोनाच्या काळात व नंतरही वीज बिल वाजवी देण्यात आले आहे. घरगुती व औद्योगिक ग्राहकांनी वीज बिलाची थकीत रक्कम भरून सहकार्य करावे.
- यू.के. राठोड, उपविभागीय अभियंता, महावितरण कंपनी, धामणगाव रेल्वे