विद्युत विषयक सुधारणासाठी १८९ कोटी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:39+5:302021-09-13T04:12:39+5:30
अमरावती : जिल्ह्यासह मेळघाटच्या धारणी, चिखलदरा तालुक्यातील सीमावर्ती ग्रामीण भागात विद्युत व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाने १८९ कोटी मंजूर ...
अमरावती : जिल्ह्यासह मेळघाटच्या धारणी, चिखलदरा तालुक्यातील सीमावर्ती ग्रामीण भागात विद्युत व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाने १८९ कोटी मंजूर केले आहे. खासदार नवनीत राणा यांनी नुकतीच केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंह यांची भेट यासंदर्भात प्रश्न मार्गी लावला.
खासदार नवनीत राणा यांच्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या विद्युत विषयक सुधारण्यासाठी १८९ कोटींचा निधी केला. आता हरिसाल येथे ९ कोटी ४० लाख रुपये खर्चून ३३ केव्हीचे सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. धारणी येथे दोन, चांदुर रेल्वे येथे दोन तर संपूर्ण जिल्ह्यात ३३ कव्हीचे १० ते १२ उपकेंद्र निर्माण करण्यात येणार असून, आता जिल्हा विजेबाबत स्वयंपूर्ण होऊन जिल्हावासीयांना लोडशेडिंगच्या जाचातून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार आहे. मेळघाटातील जरीदा येथे आजही मध्य प्रदेशातून वीजपुरवठा केला जातो. ज्यासाठी जिल्ह्याचे दरमहा दोन ते तीन कोटी मध्यप्रदेश शासनाला जातात. आता या ठिकाणी उपकेंद्र उभारून जिल्ह्यातील गावांना जिल्ह्यातूनच वीजपुरवठा केला जाईल ज्यामुळे करोडो रुपयांची बचत होईल व जारिदा सारख्या अनेक अतिदुर्गम गावांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळेल.
मेळघाटातील २४ गावे स्वातंत्र्यपासून अद्यापही अंधारात आहेत, या गावांना वीजपुरवठा व्हावा आणि आदिवासींची सर्वांगीण प्रगती व्हावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंह यांच्याकडे केली. यादरम्यान वनविभागाच्या एनओसी घेऊन तात्काळ या गावांना वीजपुरवठा करण्याचे निर्देश यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित सचिवांना दिले.