म्युकरमायकोसिसचे 194 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:00 AM2021-06-16T05:00:00+5:302021-06-16T05:00:34+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती स्थित नेहरूनगरातील एका ६० वर्षीय रुग्ण ११ जून रोजी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा उजवा डोळा खराब असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ११ जूनलाच रेफर करण्यात आले. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात येत आहेत.
इंदल चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १९४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७६ रुग्ण औषधोपचाराने बरे सुखरूप घरी गेले, तर ६५ रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया व महागडे औषधोपचार मोफत करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळू शकल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत १११ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ३३, सुपर स्पेशालिटीत तीन, पीडीएमसीत ३०, खासगी रुग्णालयात १२ रुग्णांचा समावेश आहे. तीन रुग्णांना डोळ्यात खूपच जास्त इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचे डोळे काढावे लागले, तर एका रुग्णाच्या दातात काळी बुरशीचा मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झाल्याने वरील दात काढावे लागले.
म्युकरमायकोसिसचे लक्षणे
डोळ्यांच्या पापणीला सूज, दात, दाढ दुखणे, डोकेदुखी, विसर पडणे ही म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आहेत. पोस्ट कोविड झालेल्या रुग्णांना यापैकी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करण्याचे आवाहन डॉक्टर नम्रता सोनोने यांनी केले.
उपचार सुरू असतानाच निदान
जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती स्थित नेहरूनगरातील एका ६० वर्षीय रुग्ण ११ जून रोजी दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा उजवा डोळा खराब असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात ११ जूनलाच रेफर करण्यात आले. त्याच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात येत आहेत.
३३ वर्षीय युवकाचे सोळा दात काढले
नांदगाव पेठ येथील ३३ वर्षीय रुग्णाला दातात खूपच जास्त प्रमाणात इन्फेक्शन झाल्याने त्रास असह्य झाले होते. त्यामुळे वरील १६ दातांचा अख्खा संचच काढावे लागले.
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे १९३ रुग्ण आढळले. ६५ रुग्णांची महात्मा ज्योतिराव फुल जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या शासकीय व खासगी मिळून ७८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
- डाॅ. सचिन सानप,
जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना
ही घ्या काळजी
पोस्ट कोविड झाल्यानंतर म्युकरमाकोसिसची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. हा आजार संसर्गातून होत नसला तरी त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.