अमरावती : नेमाणी गोडाऊन ते साईनगर दरम्यान ऑटोरिक्षातील प्रवासात पर्समध्ये ठेवलेले २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात दोन महिलांनी चोरून नेल्याची घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील नवाथे चौकात बुधवारी घडली. एका महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार,फिर्यादी महिला बडनेरा येथील मुलीकडे गेली होती. त्यांनी गळ्यातील ११ ग्रॅमचे मंगळसूत्र तुटलेले असल्यामुळे ते डबीत व ती डबी पर्समध्ये ठेवली होती. बडनेरा येथील सावता चौकातून ऑटोरिक्षात त्या बसल्या. ऑटोरिक्षा नेमाणी गोडावून येथे आल्यानंतर दोन महिलादेखील बसल्या. त्यांच्याकडे एक मूल होते. साईनगर येथे फिर्यादी महिला उतरली. ऑटोरिक्षा तेथून पुढे गेल्यानंतर त्यांनी पर्स बघितली असता, मंगळसूत्र चोरल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.