लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १ जूनपासून कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येण्याची संख्या कमालीची रोडावली आहे. जिल्ह्यात एकूण ६२ रुग्णालयांना कोविड-१९ उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची लाट ओसरताच रुग्णांअभावी २१ खासगी कोविड रुग्णालये ‘स्टॅंड बाय’ ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्ण घटत असल्याने खासगी रुग्णालयांतून कर्मचारी कमी करण्यास वेग आला आहे. गतवर्षी मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. यंदा फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट येताच संक्रमण आणि मृत्युसंख्याही वेगाने वाढली. परंतु आता जूनपासून अचानक संकमितांची संख्या कमी होत असल्याने राज्य शासनाने अनलॉक सुरू केले आहे. ऑगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल, असे संकेत आरोग्य यंत्रणेने दिले आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने शासकीय रुग्णालयात लहान मुलांसाठी आयसीयू, ऑक्सिजनने सुसज्ज बेडचे वार्ड तयार करण्यात आले आहे. अमरावती महानगरात १ जूनपासून कोरोना संक्रमणाचा वेग, रुग्णसंख्या कमी होत आहे. शहरात २७ खासगी रुग्णांलयांना कोविड-१९ रुग्ण उपचारासाठी मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
सुपर कोविडमध्ये १३० रुग्णयेथील शासकीय सुपर कोविड रुग्णालयात ४५० बेडची क्षमता आहे. मात्र, कोरोना रुग्णांमध्ये घट होताच येथे आजमितीला १३० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे. यातही डेंजर झोनमधील रुग्णांची संख्याही कमी झालेली आहे. यापूर्वी आयसीयू बेड २५, ऑक्सिजन बेड ९० तर सामान्य बेड २३५ अशी क्षमता होती. मात्र, जूनपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
मातृछाया, एकता हॉस्पिटलला प्रत्येकी ५० हजारांचा दंडकोविड १९ रुग्णांच्या उपचारात अनियमितता आणि देयके जास्त घेतल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील मातृछाया हॉस्पिटल आणि दर्यापूर येथील एकता हॉस्पिटलला प्रत्येकी ५० हजारांचा दंड आकारण्यात आला. दंड आकारण्याबाबत हॉस्पिटलच्या संचालकांना नोटीस बजावल्याची माहिती उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.
ही आहेत ‘स्टॅंड बाय’ रुग्णालये अमरावती येथील गुरूकृपा, प्राईम पार्क, रंगोली पर्ल, सलुजा सेलिब्रेशन, साई कोविड, श्रीपाद, गेट लाईफ, बारब्दे, दामोदर, कुसुमांजली, जिल्हा हॉस्पिटल, ढोले हॉस्पिटल, अच्युत महाराज, अंबादेवी हॉस्पिटल, चांदूर रेल्वे येथील माझी माय, हाय टेक हॉस्पिटल, मोझरी येथील आयुर्वेद कॉलेज, अचलपूर येथील भामकर, चांदूर बाजार येथील आरोग्यम्, मातृछाया