‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रियेतून २१ महिलांना मातृत्व
By admin | Published: April 18, 2016 12:16 AM2016-04-18T00:16:24+5:302016-04-18T00:16:24+5:30
स्त्रीत्वाला पूर्णत्व आई झाल्याशिवाय येत नाही. काळ कितीही बदलला, महिला आधुनिक झाल्या, स्वत:च्या पायांवर उभ्या झाल्या. परंतु मातृत्वाची ओढ मात्र कायम आहे.
वैभव बाबरेकर अमरावती
स्त्रीत्वाला पूर्णत्व आई झाल्याशिवाय येत नाही. काळ कितीही बदलला, महिला आधुनिक झाल्या, स्वत:च्या पायांवर उभ्या झाल्या. परंतु मातृत्वाची ओढ मात्र कायम आहे. तथापि आधुनिक जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे मातृत्व काही सोपे राहिलेले नाही. परंतु आता अपत्य प्राप्ती संदर्भात दाम्पत्यामध्ये काही दोष असल्यास जोडपी आता आता ‘टेस्ट ट्युब बेबी’ प्रक्रियेकडे वळत आहेत. जिल्ह्यातील ‘टेस्ट ट्युब बेबी’ केंद्राच्या माध्यमातून वर्षभरात २० दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती झाली आहे. तीन महिन्यांपूर्वीच वर्धेतील एका महिलेने याच प्रक्रियेतून जुळ्या मुलींना जन्म देऊन मातृत्वाचे सुख अनुभवले.
युरोपमध्ये ‘टेस्ट ट्युब बेबी’चा प्रयोग सर्वप्रथम यशस्वी झाला. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही उपचार पध्दती भारतातही उपलब्ध आहे. देशभरातील सात ‘टेस्ट ट्युब बेबी’ केंद्रांशी अमरावतीमधील एक केंद्रसुध्दा जुळले आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील २१ महिलांनी मातृत्व मिळविले आहे. निकोप अपत्य प्राप्तीसाठी स्त्री व पुरूषांमध्ये शारीरिक उणिवा असता कामा नये. प्राथमिक स्तरावर उपचार होऊ शकणाऱ्या समस्या थोड्याफार उपचाराने मार्गी लागतात. मात्र, अपत्य प्राप्तीची आशाच मावळली असल्यास निराश दाम्पत्य ‘टेस्ट ट्युब बेबी’च्या प्रक्रियेतून मूल जन्माला घालू शकतात. या प्रक्रियेतून अपत्य प्राप्तीचे प्रमाण ४० टक्के असल्याचे मत प्रसूती व स्रीरोगतज्ज्ञ मोनाली ढोले यांंचे आहे. ‘टेस्ट ट्युब बेबी’चा जन्म ‘इनफर्टिलिटी’या प्रक्रियेतून केला जातो. ती प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. मात्र, या पध्दतीचा वापर करून माता-पिता होण्याचे सुख अनुभवता येते. अपत्य प्राप्तीसाठी महिला व पुरुष विविध औषधोपचार घेतात, काही जण तर भोंदूबाबा व तांत्रिकाजवळसुध्दा जातात. मात्र, आता टेस्ट ट्युब बेबी हा पर्याय नवीन तंत्रज्ञानाच्या युगात उपलब्ध आहे. टेस्ट ट्युब बेबीच्या केंद्रावरून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव, शिरजगाव, परतवाडा, चांदूररेल्वे व अमरावती येथील २० दाम्पत्यांनी अपत्य प्राप्त केले असून वर्धेतील एका दाम्पत्याला जुळ्या मुलीसुध्दा झाल्या आहेत.
पती-पत्नीपैकी एकामध्ये किंवा दोघांमध्येही मोठा दोष असेल तरी सुध्दा ‘टेस्ट ट्युब बेबी’ हा एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहे.
अमरावतीच्या केंद्राच्या माध्यमातून प्रसूती : वर्धेतील महिलेला जुळ्या मुली
अशी आहे इनफर्टिलिटी प्रक्रिया
टेस्ट ट्युब बेबीच्या प्रक्रियेत स्त्रीच्या गर्भाशयातील प्रजननक्षमता तपासली जाते. त्याचप्रमाणे पुरूषांच्या विर्यातील शुक्राणुंची मात्रा सुध्दा तपासली जाते. यामध्ये काही दोष आढळल्यास डॉक्टरांमार्फत अन्य काही चाचण्या केल्या जातात. शस्त्रक्रियेद्वारे स्त्रियांची अंडी काढून व पुरुषांच्या विर्यातून शुक्राणू काढले जातात. अंडी व शुक्राणुची मात्रा अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे पाहिली जाते. त्यानंतर अंडी व शुक्राणू एकत्रित करून ते एका काचेच्या ट्युबमध्ये टाकले जातात. ती ट्युब अत्याधुनिक मशिनमध्ये योग्य तापमानात स्टोअर केली जाते. ४८ तासांपर्यंत अंडी व शुक्राणूतील प्रक्रियेच्या हालचालीकडे एकाच डॉक्टरला सात्यत्याने लक्ष ठेवावे लागते. स्त्रीची अंडी व पुरुषांतील शुक्राणूतील प्रक्रियेला इनफर्टिलिटी म्हणतात. इनफर्टिलिटी प्रक्रियेत तयार झालेले मिश्रण स्त्रीच्या गर्भाशयात इजेक्शन अथवा शस्त्रक्रियेद्वारे टाकले जाते. त्यानंतर स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूणाची निर्मिती होण्यास सुरुवात होते आणि नऊ महिन्यात गोंडस बाळ जन्माला येते. याप्रक्रियेतून जुळे बाळसुध्दा जन्माला येऊ शकते.
अमरावतीत टेस्ट ट्युब बेबीची सुविधा वर्षभरापासून उपलब्ध आहे. आतापर्यंत हा उपचार घेणाऱ्या अनेक महिलांनी गोंडस बाळांना जन्मसुध्दा दिला आहे, तर काही प्रसूतीच्या अंतिम प्रक्रियेत आहेत. वर्धेतील एका महिलेला जुळ्या मुली झाल्या असून आता त्या तीन महिन्यांच्या आहेत.
- मोनाली ढोले,
स्त्रीरोगतज्ज्ञ.
टेस्ट ट्युब बेबीची संकल्पना चांगली आहे. त्याचा फायदा निराश दाम्पत्यांनाहोत आहे. अमरावतीत टेस्ट ट्युब बेबी केंद्राच्या माध्यमातून ही किचकट प्रक्रिया यशस्वीरीत्या केली जाते. टेस्ट ट्युब बेबीचा प्रयोग साधारणत: ४० ते ५० टक्के यशस्वी होत आहे.
- पल्लवी पचगाडे,
स्त्रीरोगतज्ज्ञ, (इर्विन-डफरीन)