अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील देवगाव येथे १४ मे रोजी एकाच दिवशी २२ कोरोना रुग्ण निघाले आहेत. या एकाच गावातील कोरोना रुग्णसंख्येने आता पन्नाशी ओलांडली आहे.
देवगाव हे गवळ्यांचे गाव. या गावात वास्तव्यास असलेले बहुतेक जण एकमेकांचे जवळचे नातेवाईक. म्हणून ते नातेवाइकांचे गाव. या गावात यंदा बऱ्यापैकी लग्न झाले. सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळही वाढली. मुक्काम वाढले. लग्नाच्या सर्व विधी, सर्व सोपस्कार पार पडले. यात संपर्क वाढला आणि कोरोनाने आपले हात-पाय पसरले. एकामागून एक कोरोना रुग्ण निघू लागले. यात एकाच दिवशी निघालेल्या २२ रुग्णांमुळे हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. प्रशासन हादरले आहे. संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे कठीण होऊन बसले आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले देवगाव हे स्वच्छतेचे पुरस्कर्ते आहे. ग्रामस्वच्छता अभियानात अनेक पुरस्कार या गावाने पटकाविले. परिसरात झाडे-झुडपांमुळे ऑक्सिजनची कमी नाही. लोक कष्टकरी आहेत. अशा या गावात कोरोनाची एन्ट्री लक्षवेधक ठरली असून, सध्या गाव प्रशासनाने सील केले आहे.