अमरावती : मोतीबिंदू शस्त्रक्रिया न झाल्यास रुग्णांना काचबिंदू होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला नेत्र शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून द्यावा. मरणोत्तर नेत्रदानासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येण्यासाठी ही चळवळ जिल्ह्यात सर्वदूर पोहचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी दिले.
कर्मयोगी दृष्टिदाता डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टिक्षीणता कार्यक्रमात दृष्टिदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. नम्रता सोनोने, राजेंद्र फसाटे आदी उपस्थित होते. काळी बुरशी आजाराचा प्रादुर्भाव पाहता, कोविडपश्चात काळजीबाबत संक्रमितांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीतर्फे जिल्हा कारागृहातील कैद्यांची नेत्र तपासणी, विनामूल्य चष्मे वितरण करण्यात आलेे. तालुकास्तरावरही नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना विनामूल्य चष्मे दिले, अशी माहिती जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. नम्रता सोनोने यांनी सांगितले.
बॉक्स
मरणोत्तर नेत्रदानासाठी अधिकाधिक संकल्प आवश्यक
दृष्टिदान सप्ताहात ५३ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व एका रुग्णावर काचबिंदू शस्त्रक्रिया होऊन अशा ५४ रुग्णांना दृष्टिलाभ झाला. एप्रिलपासून आतापर्यंत २८९ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. ही कामे निरंतर ठेवण्याबरोबरच मरणोत्तर नेत्रदानासाठी अधिकाधिक व्यक्तींनी संकल्प करणे आवश्यक आहे. त्यासाठी निरनिराळे उपक्रम आखावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बाॅक्स
नेत्रदात्यांचे सॉफ्टवेअर तयार करा
दृष्टिदान दिनानिमित्त सेल्फी पॉईंटचा उपक्रम नेत्र विभागाने राबवला. त्यात ५१ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याचप्रमाणे, ‘ एहसास करे नेत्रहीन का दर्द’ हा हरीना फाऊंडेशनचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. असे उपक्रम सातत्याने राबवावेत व नेत्रदात्यांचे सॉफ्टवेअर तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.