नववीत सात जागांच्या प्रवेशासाठी ३४० विद्यार्थ्यांनी दिली ‘नवोदय’ची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:14 AM2021-02-25T04:14:40+5:302021-02-25T04:14:40+5:30
अमरावती : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीत सात जागांच्या प्रवेशासाठी तब्बल ...
अमरावती : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिनस्थ असलेल्या येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीत सात जागांच्या प्रवेशासाठी तब्बल ३४० विद्यार्थ्यांनी बुधवारी परीक्षा दिली. शहरात एकूण तीन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली असून, कोरोना नियमांचे पालन करून परीक्षांचे नियोजन करण्यात आले.
येथील मणीबाई गुजराती हायस्कूल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल आणि जवाहर नवोदय विद्यालय या तीन केंद्रांवर ३४० विद्यार्थ्यांनी नववीच्या प्रवेशासाठी परीक्षा दिली. या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका दिल्ली येथील सीबीएसई केंद्रातून आल्या होत्या. परीक्षा नोंदणी आणि ओळखपत्रदेखील ऑनलाईन प्राप्त झाले होते. सकाळी ११ ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत अडीच तास या परीक्षेची वेळ निश्चित केली होती. नववीच्या सात जागांसाठी अमरावती जिल्ह्यातील ६८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४९ परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयावर आधारित ही परीक्षा घेण्यात आली असून, भाषा आणि समाजशास्त्र विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. इयत्ता सहाव्या वर्गात ८० जागांच्या प्रवेशासाठी १० एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
-------------------
अशी झाली केंद्रनिहाय परीक्षा
जवाहर नवोदय विद्यालय- १५६
मणीबाई गुजराती हायस्कूल- ९५
जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल- ८९
-------------------------------
कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात आली. केंद्रावर शारीरिक अंतर ठेवूनच परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. एकूण ६८२ विद्यार्थ्यांनी नवव्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ३४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
- सशिंद्रन सी. के., प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय