३५० शिक्षक बदली आदेशासाठी रस्त्यावर
By admin | Published: September 27, 2016 12:14 AM2016-09-27T00:14:47+5:302016-09-27T00:14:47+5:30
मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत १५ वर्षे सेवा बजावणाऱ्या ३५० शिक्षकांच्या जिल्हा परिषद प्रशासनाने...
बेमुदत उपोषण : जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचा डेरा
अमरावती : मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत १५ वर्षे सेवा बजावणाऱ्या ३५० शिक्षकांच्या जिल्हा परिषद प्रशासनाने मागील जून महिन्यात बदल्या केल्यात. मात्र या शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त करण्यात न आल्याने याविरोधात मेळघाट कृती समितीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जि.प. प्रशासनाने न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून सन २०१५-१६ मध्ये बदली प्रक्रिया राबवून विषय शिक्षकांच्या नेमणुकी अतिरिक्त शिक्षकांचे तालुका व जिल्हास्तरावर समायोजन तसेच मेळघाटात १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या २०८ शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. या बदल्या झाल्यानंतर प्रशासकीय बदलीमध्ये एकास एक या प्रमाणात बदली होऊन सपाटीवरील शिक्षकांनी शासनाची दिशाभूल करून झालेली प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका दाखल झाल्यामुळे खोळंबून पडली होती. याबाबत न्यायालयाने शासनाच्या बाजूने नुकताच निकाल दिला आहे. त्यामुळे जूनमध्ये करण्यात आलेली बदली प्रक्रिया ही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना आदेश देता आले नाही. परंतु आता ६ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने विषय शिक्षक, अतिरिक्त शिक्षक तसेच मेळघाटातून प्रशासकीय बदल्या झालेल्या शिक्षकांना आदेश देणे आवश्यक होते. याबाबत मेळघाट कृती समितीने सीईओ किरण कुलकर्णी यांची दोनदा भेट घेऊन झालेल्या बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश निवेदनात दिले. दरम्यान २६ सप्टेंबरपर्यंत बदली आदेश देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी केली आहे. उपोषणात मेळघाट कृती समितीचे मनिष काळे, सूरज वाघमारे, विकास भडांगे, अनिल वानखडे, दिलीप जावरकर, प्रियदर्शी मेंढे, इमरान खान, राऊब खान, वंदना धवणे, लिला साळुंके, संगीता उंबरकर, प्रवीण ढोके, भूषण बागड, प्रशांत पवार,उमेश आडे, शिक्षकांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)