चिखलदऱ्यात लागलेल्या आगीत ३७ घरे बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:16 PM2018-04-10T12:16:15+5:302018-04-10T12:16:25+5:30

सेमाडोह येथील मुलताई ढाण्यात सोमवारी सकाळी ९.३० वाजता अचानक आग लागल्याने सुमारे ३७ घरांची राखरांगोळी झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आदिवासी उघड्यावर आले आहेत.

37 houses burnt down in a fire in Amravati district | चिखलदऱ्यात लागलेल्या आगीत ३७ घरे बेचिराख

चिखलदऱ्यात लागलेल्या आगीत ३७ घरे बेचिराख

Next
ठळक मुद्देम्हैस ठारआदिवासी कुटुंबे उघड्यावरआयुष्याची पुंजी उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  सेमाडोह येथील मुलताई ढाण्यात सोमवारी सकाळी ९.३० वाजता अचानक आग लागल्याने सुमारे ३७ घरांची राखरांगोळी झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आदिवासी उघड्यावर आले आहेत. आग विझवण्यासाठी चिखलदरा व अचलपूर येथून अग्निशमन दल पाठविण्यात आले होते. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळाला भेट देऊन प्रशासनाला आगग्रस्तांना मदतीच्या सूचना दिल्या.
येथील सोनुजी येवले यांच्या घराशेजारी असलेल्या उकिरड्यावर चुलीतील गरम राख फेकल्याने सर्वप्रथम कचऱ्याने पेट घेतला. तेथून एका रांगेत असलेल्या घरांनी एकापाठोपाठ पेट घेतला. त्यात जवळपास ३७ घरे पूर्णत: नष्ट झाली. त्यामुळे आदिवासी आणि गवळी बांधवांचा संसार उघड्यावर आला आहे. आगीत एक म्हैस ठार झाली. मुलताई ढाण्यातील आदिवासी दोन किलोमीटर अंतरावरील रोहयोच्या कामावर गेले होते. यामुळे घरांना आग लागली तेव्हा मोजकेच लोक ढाण्यात होते. घरात साठवून ठेवलेले पाणी नागरिकांनी आगीवर ओतले; मात्र हवेच्या वेगाने कुडा-मातीची घरे व गवती छपरामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.
अचलपूर व चिखलदरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जाऊन आग आटोक्यात आणली. आगीची माहिती मिळताच आमदार प्रभुदास भिलावेकर, उपविभागीय अधिकारी विजय राठोड, चिखलदराचे तहसीलदार प्रदीप पवार, जि.प. सदस्य सुनंदा काकड, गाजू काकड, प्रदीप सेमलकर, शिवा काकड, राजा तनपुरे, रामदास बावसकर, लाला मावस्कर, भला मावस्कर, संदीप बारावेसह गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली. आगग्रस्त कुटुंबांना प्रशासनाच्यावतीने तात्पुरती निवासाची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेतील दोन सभागृहांमध्ये करण्यात आली आहे. धान्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली. शासननियमानुसार मदत दिली जाणार असल्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले.

दोन चिमुकले बचावले, मातेचा आकांत
या आगीत एका झोपडीमध्ये दोन चिमुकले झोपले होते. आग लागताच सर्वत्र एकच हल्लकल्लोळ माजला.एका घरात दोन चिमुकले झोपले होते. समयसूचकता दाखवित ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले. एक पाच वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याने तिच्या आईने रडून आकांत केला. ती जळाल्याची भीती व्यक्त होत असताना, आगीच्या भीतीने सेमाडोह गावात गेलेली ती बालिका परतली. यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

सेमाडोह येथील आगग्रस्तांना शासनामार्फत तात्काळ सुविधा देण्यासोबत त्यांच्या निवासाची व धान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत.
प्रभुदास भिलावेकर, आमदार, मेळघाट

Web Title: 37 houses burnt down in a fire in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग