रेल्वेत सात दिवसात ४२ हजार विनातिकिट प्रवाशांना ३.७३ कोटींचा दंड
By गणेश वासनिक | Published: November 16, 2023 04:20 PM2023-11-16T16:20:22+5:302023-11-16T16:23:06+5:30
९ ते १५ नोव्हेंबर या दरम्यान विशेष ड्राईव्ह; रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर विनातिकीट, अनधिकृत प्रवाशांविरूद्ध धडक मोहीम
अमरावती : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या ५३७ तिकीट तपासणी कर्मचारी ९ ते ११ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर विनातिकीट, अनधिकृत प्रवाशांविरूद्ध धडक मोहीम राबविली. यात ४२ हजार प्रवाशांकडून ३.७३ कोटींचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम प्रस्थापित करणारी ठरली, हे विशेष.
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागाचे ५३७ तिकीट तपासणी कर्मचारी यांनी ९ ते १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहीम राबविली. यात अमरावती, बडनेरा, अकोला, खंडवा, शेगाव, जळगाव, पाचोरा, बोदवड, पाचोरा, नांदिरा आदी रेल्वे स्थानकावर तिटीक तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात विनातिकीट, अनधिकृत प्रवासाच्या एकूण ४१, ८९४ प्रकरणांतून एकूण ३. ७३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. विशेषत: एकाच दिवशी ११ नोव्हेंबर रोजी भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आजपर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण ७३७० प्रवाश्यांकडून एकूण ६८.८५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करता यावा आणि विनातिकीट, अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल, एक्स्प्रेस, सुविधा ट्रेन्स, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे कार्य निरंतरपणे करण्यात येणार आहे.
प्रवाशांनी गैरसोय टाळावी. सन्मानाने प्रवास करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा. विनातिकिट प्रवास करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाईच्या सामाेरे जावे लागेल.
- जिवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ रेल्वे