३.७३ लाख हेक्टर बाधित, २५४ कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:01:05+5:30
यंदाच्या खरिपातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या सोंगणी व मळणीचा हंगाम सुरू असताना दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास पळविला. सोंगणी केलेले सोयाबीन शेतातच सडले. ज्या शेतात सोंगणी व्हायची होती, त्या शेतातील उभे सोयाबीन जागीच सडले. गंजीमधील सोयाबीनच्या शेंगांना बीजे फुटली.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने खरिपासोबतच ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा ३ लाख ७५ हजार ३९८ शेतकऱ्यांना फटका बसला. या आपत्तीसाठी शेतकऱ्यांना एनडीआरएफची मदत मिळण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने २५४ कोटी ४० लाख ४३ हजार ४८४ रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे.
यंदाच्या खरिपातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या सोंगणी व मळणीचा हंगाम सुरू असताना दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. सोंगणी केलेले सोयाबीन शेतातच सडले. ज्या शेतात सोंगणी व्हायची होती, त्या शेतातील उभे सोयाबीन जागीच सडले. गंजीमधील सोयाबीनच्या शेंगांना बीजे फुटली. दाण्यांवर बुरशी आल्याने प्रतवारी खराब झाली, कपाशीचे बोंडे दहा दिवसांच्या पावसामुळे सडली. कापूस ओला झाला. सरकीला बीजांकुर फुटले. ज्वारीची कणसे काळी पडली, कणसामधील दाण्यांना कोंब फुटले, या नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण व संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ आॅक्टोबर रोजी दिले. यासाठी ६ नोव्हेंबर डेडलाइन देण्यात आली. मात्र, नुकसानाची तीव्रता पाहता, पंचनाम्याला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. अखेर ११ नोव्हेंबरला संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली व याबाबतचा संयुक्त अहवाल सोमवारी रात्री उशिरा शासनाला पाठविण्यात आला. यामध्ये ९४ टक्के शेतकºयांच्या पिकांचे ७८ टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, खरिपाचे ३ लाख ७३ हजार १९ हेक्टर क्षेत्रात ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. हे नुकसान एनडीआरएफच्या निकषानुसार शासन मदतीस पात्र आहे. यासाठी दोन हेक्टर मर्यादेत ६८०० रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे २५३ कोटी ६५ लाख ३५ हजार ८६४ रुपयांचा अपेक्षित निधी लागणार आहे. अवकाळी पावसामुळे २,१२,३२९.४४ हेक्टरवरील सोयाबीन, १,३५,४७२.७० हेक्टरवरील कपाशी, ११,०३६.९७ हेक्टरवरील ज्वारी, २,७०६.२३ हेक्टरवरील तूर, ५०६३ हेक्टरवरील मका, ५,५३८ हेक्टरवरील धान, १२६ हेक्टरवरील उडीद व ७४७ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
‘एनडीएरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टर क्षेत्रमर्यादेत जिरायती शेतीला ६८०० रुपये, बागायती पिकांना १३ हजार ५०० रुपये व बहुवार्र्षिक पिकांना १८००० रुपये प्रतिहेक्टर या प्रमाणात मदत मिळू शकते. यासाठी अपेक्षित निधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेला आहे.
२,६५,०८३ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र
‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार फक्त दोन हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र राहणार आहे. त्यामुळे जिरायतीच्या एकूण बाधित क्षेत्राच्या २ लाख ६५ हजार ८३ हेक्टर क्षेत्राला ही मदत मिळणार आहे. याव्यतिरिक्त नुकसान झालेले १ लाख ७ हजार ९६६ हेक्टर क्षेत्र हे दोन हेक्टर मर्यादेहून जास्त असल्याने मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बागायती पिकांमध्ये दोन हेक्टरखालील ३८६ हेक्टर क्षेत्रासाठी मदत मिळू शकते. मात्र, ६५ हेक्टर क्षेत्राला शासन मिळणार नाही. बहुवार्षीक फळपिकांमध्ये ४५ हेक्टरसाठी शासन मदत मिळण्याची शक्यात आहे, तर ३३ हेक्टरमध्ये शासन मदत मिळणार नाही.