जिल्हा परिषदेत ३९ परिचर,पट्टीबंधक झाले कनिष्ठ सहायक; गट ‘ड’ संवर्गातून मिळाली पदोन्नती अन नियुक्त पत्रही
By जितेंद्र दखने | Published: March 16, 2024 06:46 PM2024-03-16T18:46:08+5:302024-03-16T18:46:46+5:30
सर्व परिचरांच्या पदोन्नतीची यादी तयार करून पदोन्नती समितीच्या १३ मार्च रोजी दिलेल्या मंजुरी दिली आहे.
अमरावती: जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत विविध विभागांत कार्यरत असलेल्या परिचर, पट्टीबंधक या गट ‘ड‘ या संवर्गातील ५८ कर्मचाऱ्यांपैकी ३९ कर्मचाऱ्यांची पदोन्नतीद्वारे ‘कनिष्ठ सहायक’ पदावर निवड केली आहे. १५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने पार पडली. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अधिसूचनेनुसार ७ मार्च २०२४ नुसार गट ‘ड’ पदावरून कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीचे प्रमाण २५ टक्क्यांवरून ४० टक्के केले आहे.
याशिवाय कार्यासन अधिकारी ग्रामविकास विभाग ११ मार्च पत्रान्वये अधिसूचना लागू केल्यात आहेत. त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस यांनी शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. त्यानुसार सर्व परिचरांच्या पदोन्नतीची यादी तयार करून पदोन्नती समितीच्या १३ मार्च रोजी दिलेल्या मंजुरी दिली आहे.
या पदोन्नतीसाठी ३९ पदांकरिता गट ‘ड’मधील परिचर, पट्टीबंधक यांची निवड करण्यात आली. याकरिता परिचर, पट्टीबंधक यांना त्यांच्या पदस्थापना देण्यासाठी १५ मार्च रोजी समुपदेशन प्रक्रिया घेऊन संबंधित कर्मचारी कनिष्ठ सहायक पदावर नियुक्ती दिली आहे. या समुदेशन प्रक्रियेसाठी सहायक प्रशासन अधिकारी नीलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाणे, श्रीकांत मेश्राम, वरिष्ठ सहायक सुजित गावंडे, सतीश पवार, कनिष्ठ सहायक राहुल रायबोले, समक्ष चांदुरे यांनी प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडली.