‘डीपीसी’तून महापालिकेला ४ कोटी ६० लाख मंजूर

By admin | Published: February 27, 2016 12:43 AM2016-02-27T00:43:01+5:302016-02-27T00:43:01+5:30

जिल्हा नियोजन समितीने नगरसेवकांना विकासकामांसाठी सहायक अनुदान म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

4 crore 60 lakh sanctioned to municipal corporation from 'DPC' | ‘डीपीसी’तून महापालिकेला ४ कोटी ६० लाख मंजूर

‘डीपीसी’तून महापालिकेला ४ कोटी ६० लाख मंजूर

Next

पालकमंत्र्यांचा पुढाकार : प्रत्येक नगरसेवकाला विकासकामांसाठी मिळणार पाच लाख
अमरावती : जिल्हा नियोजन समितीने नगरसेवकांना विकासकामांसाठी सहायक अनुदान म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पुढाकार घेतला असून ४ कोटी ६० लाख रुपये महापालिकेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. हे अनुदान लवकरच महापालिकेला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये विकासकामांसाठी वितरीत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या निधीतून प्रभागात आवश्यक आणि नागरिकांच्या हिताची विकासकामे करता येणार आहेत. महापालिकेला मूलभूत सुविधा, नगरोत्थान, अतिवृष्टी, रस्ते अनुदान अशा विविध शिर्षातंर्गत निधी प्राप्त होतो. मात्र, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महापालिका नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी देण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे. मागील जिल्हा नियोजन समितीत मंजूर करण्यात आलेल्या सहायक अनुदान वाटपाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले होते. या निर्देशांचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकासकामांसाठी नगरसेवकांना ४ कोटी ६० लाख रुपये सहायक अनुदान मंजूर केल्याची माहिती दिली. या अनुदानातून मोठ्या स्वरुपाची कामे अपेक्षित आहेत. मात्र, पुढील वर्षी नगरसेवकांना सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्यामुळे समान निधी वाटप होणार असल्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या हिताची कामे करावी लागणार आहेत. यापूर्वी महापालिका प्रशासनाने रस्ते अनुदानातून विशेष रस्ते निर्मितीवर खर्च करण्याचे नियोजन केले असले तरी या सहायक अनुदानातून पुन्हा लहान, मोठ्या रस्त्यांची कामे हाती घेतली जातील, अशी माहिती आहे. महापालिकेत एकूण ९२ सदस्य असून एका नगरसेवकाच्या वाट्याला पाच लाख येणार आहेत. अनुदानातून रस्ते निर्मितीसह इतर विकासकामे करता येतील. नगरसेवक सुचवतील त्याच विकासकामांवर हे अनुदान खर्च करावे लागेल. अनुदानातून कामे करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. नगरसेवकांनी विकासकामांची यादी सादर केल्यास निविदा प्रक्रिया राबवून इस्टिमेट तयार करणे, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जातील. (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
पालकमंत्री प्रवीण पोटे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांमधून भाजपाचे आमदार आहेत. मात्र, महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना देखील पालकमंत्री पोटे यांनी नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहायक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून अनुदान वाटपाच्या घेतलेल्या निर्णयाासाठी महापालिकेतील सत्तापक्षाने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पालकमंत्री पोटे हे विकासात्मक दृष्टीने कामे करीत असल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून उमटू लागल्या आहेत.

सहायक अनुदानाचे ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रत्येक नगरसेवकाला पाच लाख रुपये विकासकामांसाठी मिळतील. या अनुदानातून विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. सभागृहात याबाबत निर्णय होईल.
- जीवन सदार
अतिरिक्त शहर अभियंता, महापालिका.

Web Title: 4 crore 60 lakh sanctioned to municipal corporation from 'DPC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.