अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सोमवार, ५ जुलै ही परीक्षा अर्ज़ सादर करण्याची शेवटची तारीख असल्याने सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज़ सादरीकरणासाठी एकच गर्दी केली होती. मात्र, उन्हाळी २०२१ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जास मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.
बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी सत्र- २, ४ व ६ या परीक्षांकरिता नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज, वार्षिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे डॉक्टर ऑफ फार्मसी भाग -१ ते ५, डिप्लोमा ईन ह्युमन राईटस्, डिप्लोमा ईन टेक्सटाईल्स, डिप्लोमा ईन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा ईन फायनान्स मॅनेजमेंट, डिप्लोमा ईन मार्केर्टिंग या अभ्यासक्रमाच्या परीक्षांकरिता ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी विद्यार्थ्याना ५ जुलैपर्यंत उन्हाळी परीक्षांचे अर्ज सादर करण्यासाठी अवधी होता. आता विद्यार्थ्यांनी ९ जुलैपर्यंत सादर केलेल्या परीक्षा अर्जांची महाविद्यालयांनी लॉगीनद्धारे पडताळणी करून अशा विद्यार्थ्यांची यादी आवश्यक शुल्कासह विद्यापीठाकडे जाहीर होणाऱ्या तारखेस सादर करावी लागणार आहे.
---------------------
सायबर कॅफेवर सोमवारी चिक्कार गर्दी
उन्हाळी २०२१ ऑनलाईन परीक्षांचे अर्ज सादर करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. परिणामी गाव, खेड्यातून विद्यार्थ्यांनी येथील सायबर कॅफेवर चिक्कार गर्दी केली होती. कोविड-१९ च्या नियमांचे पालन झाले आले नाही, असे चित्र सर्वदूर होते. विद्यापीठाच्या वित्त विभागातही ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काची पावती सादर करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
-------------------
गत काही दिवसांपासून महाविद्यालय आणि सायबर कॅफेवर ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी माेठी गर्दी होत आहे. सोमवार हा शेवटचा दिवस असल्याने या गर्दीत वाढ झाली. मात्र, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी ४ दिवस मुदतवाढ देण्यात आली.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.