अमरावती - धारणी तालुक्यातील रोहणीखेडा शिवारात एका शेतात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चर खोदण्याचे काम सुरू असताना, एका मजुराला एका मडक्यात तांब्याची यात नाणी मिळाली. ती नाणी महसूल व पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली असून, पुढील कारवाईकरिता ती जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या रोहणीखेडा शिवारात बुढा तोट्या दहीकर यांचे टेकडीवर शेत आहे. त्या शेताच्या बांधावर चर खोदकाम सुरू होते. त्या कामाकरिता गावातील १८० मजुरांची उपस्थिती होती. मजूर रघुनाथ सोमा जावरकर व त्याची पत्नी खोदकाम करत असताना, त्यांना मातीच्या मडक्यातून मातीने माखलेली तांब्याची नाणी मिळाली. त्या दोघांनी ती नाणी कोणालाही माहिती होऊ न देता पिशवीमध्ये भरली व काम संपल्यावर ते दोघेही घराकडे पळायला लागले. अन्य मजुरांनी त्या दाम्पत्याला पिशवीत काय नेत आहे, हे वारंवार विचारले. पण, त्यांनी सांगण्यास नकार दिला. त्यातीलच एका मजुराला संशय आल्याने त्याने आणखी १५ मजुरांना घेऊन पुन्हा खोदकाम सुरू केले. तेथे त्याला एक नाणे मिळाले. त्यावरून रघुनाथला नाणी मिळाल्याची कल्पना मजुरांना आली. याबाबत महसूल प्रशासनाला कळविण्यात आले.पिशवीत ४०३ नाणीघटनास्थळावर नायब तहसीलदार अनिल नाडेकर व सराफ धुर्वे यांनी भेट देऊन एका मजुराला मिळालेले ते नाणे ताब्यात घेतले आणि गावात जाऊन रघुनाथचा शोध घेतला. रघुनाथने ती नाण्याची पिशवी छपराच्या लाकडाला बांधून ठेवली होती. त्यातील नाण्याचे मोजमाप केले असता, ती ४०३ नाणी भरली. एकूण ४०४ नाणी महसूल प्रशासनाने आयपीएस तथा ठाणेदार निकेतन कदम यांच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये ठेवली आहे.
नाण्यांवर उर्दू लिपीजमिनीत असल्याने नाण्यांवर मातीचा घट्ट थर आहे. त्यावर उर्दू अक्षरात लिखाण केले असून, ती मुगलकालीन नाणी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ती नाणी पोलीस प्रशासन सोमवारी धारणी येथील कोषागार कार्यालयात जमा करणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे ती सोपविली जातील. यानंतर ती नाणी ही किती वर्षांपूर्वीची, याचा उलगडा होणार आहे.
मजुरांना मिळालेली ४०४ तांब्याची नाणी महसूल प्रशासनाने आमच्याकडे सोपविली. ती नाणी कोषागार कार्यालयात जमा करण्यात येतील. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येणार आहे.- निकेतन कदम, ठाणेदार, धारणी