५०५ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:56+5:302021-04-23T04:14:56+5:30
३३४ गावांत कोरोना बाधित रुग्ण; प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन अमरावती : कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात काेरोनाचा ...
३३४ गावांत कोरोना बाधित रुग्ण; प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन
अमरावती : कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात काेरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३३४ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप ५०५ ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांनी कोराेनाला वेशीवर रोखले आहे.
देशात मार्च २०२० मध्ये कोरोना संकटाला सुरूवात झाली. पण ३ एप्रिल २०२० पर्यंत अमरावती जिल्हा कोरोनामुक्त होता. ४ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिल्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील १,६८८ गावांपैकी ९९८ गावांनी कोरानाला वेशीवर रोखले होते. पण दुसऱ्या लाटेत यातील अनेक गावांत कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. अद्यापही ५०५ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील गावांत कोरोना संसर्गाला वेशीवर रोखण्यात आजघडीला यश आले आहे. याकरिता संबंधित गावांत करण्यात आलेल्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, ग्राम दक्षता समित्या व नागरिकांच्या सहकार्य व सतर्कतेमुळे या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता मुनादी विविध प्रकारची जनजागृती केली जात आहे. याशिवाय नागरिकांना नियमित मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, नियमित हात धुणे, गर्दीला मनाई करणे यासारख्या उपाययोजनांकरिता केलेले आवाहनाचे पालन केले जात असल्याने जिल्ह्यातील ५०५ गावे आजही कोरोना संसर्गापासून मुक्त आहेत.
बॉक्स
सद्यास्थितीत रुग्ण
५९१२४
शहरी रुग्ण -३४४७७
ग्रामीण रुग्ण-२२६८८
कोरोनावर मात -१८९०२
एकूण मृत्यू -३६७
जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला-४ एप्रिल २०२०
जिल्ह्यातील एकूण गावे -१६८६
गावात कोरोनाचा रुग्ण नाही -५०५
कोट
धामणगाव रेल्वे तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी आम्ही गावात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना केल्यात. याकरिता ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने कोरोनाला आजघडीला वेशीवर रोखण्यात यश आले आहे.
- मनीषा रोकडे,
सरपंच, बोरगाव निस्ताने
कोट
कोरोनाचा संसर्ग गावात पसरू नये याकरिता ग्रामपंचायतीमार्फत गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे जनजागृती केली. याशिवाय नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, नेहमी हात धुवावेत व शाराीरिक अंतर ठेवावे या त्रिसूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. यासोबत आरोग्य कर्मचारी आशा व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या माध्यमातून खबरदारीच्या उपाययोजनांमुळे बोडना गावात कोरोना संसर्ग रोखण्यात यश आले आहे.
- अनुसया सोनोने,
सरपंच, बोडणा परसोडा
कोट
कोरोना संसर्ग आल्यापासून सासन, रामापूर गावात कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाचा संसर्ग पसरू नये, याकरिता ग्रामपंचायतीच्यावतीने गावात स्वच्छता मोहीम, जंतुनाशक फवारणी, नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, नियमित हात धुणे, याकरिता जनजागृती व नागरिकांनाकडून मिळत असलेला प्रतिसाद तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका यांच्यासह नागरिकांचे सहकार्यामुळे कोरोना वेशीवर रोखण्यात यश आले.
- विनोद सोनोने,
सरपंच
सासन रामापूर