जिल्ह्यातील ६१ तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:07+5:302021-04-09T04:14:07+5:30
५३६ तलाठी, ९३ मंडळ अधिकाऱ्यांची पदे मंजूर अमरावती : डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड माडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत तलाठी व मंडळ ...
५३६ तलाठी, ९३ मंडळ अधिकाऱ्यांची पदे मंजूर
अमरावती : डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड माडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप शासनाकडून मिळणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ६० तलाठी व १ मंडळ अधिकारी आदींकरिंता लॅपटॉपची मागणी नोंदविली होती.
डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड माडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपची क्लाउड सर्व्हेअरसोबत जोडणीसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप खरेदीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्या मोर्शी तालुक्यातील ५, अचलपूर ९, अंजनगाव सुर्जी १०, तिवसा १२, धारणी १०, वरूड तालुक्यातील १५ अशा ६१ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवा लॅपटॉप मिळणार आहे. जिल्ह्यात महसूल मंडळ अधिकाऱ्यांची ९३ पदे मंज़ूर आहेत. यापैकी १३ पदे रिक्त असून ८९ मंडळ अधिकारी कार्यरत आहेत. तलाठ्यांची ५३६ पदे मंजूर असून २२ पदे रिक्त आहेत. ५१४ कार्यरत आहेत. या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांपैकी ६१ जणांकडील लॅपटॉप कालबाह्य झाल्यामुळे जिल्हा महसूल विभागाने शासनाकडे ६० तलाठी व १ मंडळ अधिकारी अशा ६१ जणांकरिता नवीन लॅपटॉपची मागणी केली होती.त्यानुसार लवकरच या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप मिळणार आहे.
बॉक्स
पूर्वीचे लॅपटॉप झाले कालबाह्य, नादुरुस्त !
ई महाभूमी अंतर्गत ई- फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपची क्लाऊडची सर्व्हेरसोबत जोडणी करण्याकरिता २०१७ मध्ये १५० जणांना व २०१८ मध्ये उर्वरित तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले हाेते. त्यापैकी जिल्ह्यातील ६० तलाठ्यांचे व एका मंडळ अधिकाऱ्याकडील लॅपटाॅप कालबाह्य व नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना मागणीनुसार नवे लॅपटॉप दिले जाणार आहेत.
बॉक्स
नवे लॅपटॉप मिळणारे तलाठी
६०
मंडळ अधिकारी १
कार्यरत तलाठी ५१४
कार्यरत मंडळ अधिकारी
८०
कोट
यापूर्वी २०१७ व १८ मध्ये तलाठ्यांना लॅपटॉप दिले होते.तलाठयाचे कामकाज संगणीकृत झाले आहेत. त्यानुसार काही जणांना मिळालेला लॅपटॉप नादुरुस्त आणि कालबाह्य झाल्याने काम करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे वेळेवर आणि जलगतीने कामकाज करण्यासाठी नवीन लॅपटॉप मिळणे आवश्यक आहे. सोबतच प्रत्येक तालुकास्तरावर नादुरुस्त लॅपटॉपच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ नेमावा.
- पवन राठोड,
जिल्हाध्यक्ष विदर्भ पटवारी संघ
जिल्हा शाखा अमरावती
काेट
जिल्ह्यात ज्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे लॅपटॉप नादुरुस्त व कालबाह्य झाले आहेत. अशा ६१ जणांना शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून नवीन लॅपटॉप उपलब्ध करून दिले जातील.
- नितीन व्यवहारे,
निवासी उपजिल्हाधिकारी
कोट
शासनाकडून सन २०१९ मध्ये जिल्ह्यात कार्यरत मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप व प्रिन्टर मिळाले होते. लॅपटॉप नादुरुस्त झाल्यास कामे करण्यास अडचणी येतात. त्यामुळे लॅपटॉप नादुरुस्त असल्यास तातडीने दुरुस्त करून मिळावा, सोबतच तलाठ्यांना सातबाऱ्यावर जे शुल्क मिळते त्यावर मेंटनन्सकरिता खर्च मिळावा.
- शेषराव लंगडे,
जिल्हाध्यक्ष विदर्भ मंडळ अधिकारी संघ
शाखा अमरावती